राजस्थानच्या कुख्यात गुंड टोळीतील 5 आरोपी शिर्डीत जेरबंद

शिर्डी व जयपूर पोलिसांची संयुक्त कारवाई
राजस्थानच्या कुख्यात गुंड टोळीतील 5 आरोपी शिर्डीत जेरबंद

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

मध्यप्रदेशात तपासासाठी गेलेल्या राजस्थानातील पोलीस उपनिरीक्षकावर फायरींग करून रिव्हॉल्व्हर घेऊन पसार झालेल्या कमलसिंग राणा या कुख्यात गुंड टोळीतील पाच जणांना शिर्डी पोलीस व जयपूर पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवत शिर्डीत जेरबंद केले आहे.

पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी शिर्डीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ उपस्थित होते. उपअधीक्षक मिटके म्हणाले, राजस्थान-मध्यप्रदेश सिमेवर ही टोळी कमलसिंग राणा नावाने कुख्यात आहे. या टोळीवर राजस्थानमध्ये 37 पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत.

तीन दिवसांपूर्वी कारवाईसाठी मध्यप्रदेशातील निमज येथे गेलेल्या राजस्थान पोलिसांवर गोळी झाडून हे आरोपी पसार झाले होते. या गोळीबारात राजस्थानच्या निंबाहेडा पोलीस ठाण्याचा एक उपनिरीक्षक जखमी झाले आहे. तेव्हापासून राजस्थान पोलीस या आरोपींच्या मागावर होते. या टोळीवर 70 हजारांचे बक्षीस मध्यप्रदेश व राजस्थान पोलिसांकडून जाहीर करण्यात आले होते, असेही मिटके यांनी सांगितले.

मिळालेल्या गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे शिर्डी व जयपूर पोलिसांनी क्युआरटी टीमच्या मदतीने शिर्डीत रविवारी मध्यरात्री एका हॉटेलात शोध मोहीम राबवुन या पाच जणांना जेरबंद केले. यात टोळी प्रमुख कमलसिंग डुंगरसिंग राणा, सत्येंद्रसिंग भारतसिंग, ओमप्रकाश काळुराम रावत, विरेंद्रसिंग जाट, चंदरसिग भवंरसिग यांचा समावेश आहे़. आरोपींकडे शस्त्र असल्याच्या शक्यतेने शिर्डी क्युआरटी टीमची मदत घेण्यात आली. मात्र त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे शस्त्र आढळले नाही, असे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सांगितले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com