रांजणखोल शाळा व अंगणवाडी मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

रांजणखोल शाळा व अंगणवाडी मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप

रांजणखोल |वार्ताहर| Rajangav

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेअंतर्गत रांजणखोल जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 14 वयोगटातील अंदाजे 28 टक्के मुलांना आतड्यांमध्ये परजीवी जंतापासून धोका आहे. आतड्यांतील कृमी दोष हा बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणार्‍या रक्तक्षय व कुपोषणास जबाबदार आहे. यामुळे मुला-मुलींच्या शिक्षणावर व पुढील आयुष्यातील मिळकतीवर विपरीत परिणाम होतो. तीव्र प्रमाणात कृमी दोष असलेले विद्यार्थी बरेचदा आजारी असतात. त्यांना लवकर थकवा येतो व अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत होत नाही. यामुळे बरेचदा शाळेत ते अनुपस्थित असतात. आतड्यांतील कृमी दोष वैयक्तीक व परिसर अस्वच्छतेमुळे होतात. बालकांमध्ये याचा प्रसार दूषित मातीद्वारे सहजतेने होतो. शाळा व अंगणवाडी पातळीवरून देण्यात येणारी जंतनाशक गोळी ही फार परिणामकारक असल्याची माहिती आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. काजल वर्पे यांनी यावेळी दिली.

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा उद्देश 1 ते 19 वयोगटातील सर्व मुला-मुलींना अंगणवाडी व शाळेच्या ठिकाणी जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे. तसेच पोषणस्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, नगरपालिका दवाखाने व महानगरपालिका येथील सर्व वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेनिमित्त 10 ऑक्टोबर 2022 रोजी शाळेमधील 6 वर्षे ते 19 वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलींना तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये 1 ते 6 वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात आल्याचे डॉ. वर्पे यांनी सांगितले.

जे लाभार्थी या दिवशी आजारी असेल किंवा इतर कारणामुळे गोळी घेणे शक्य झाले नाही, त्यांना 17 ऑक्टोबर 2022 रोजी शाळा व अंगणवाडी केंद्रामध्ये मॉप अप दिनी गोळी देण्यात येणार असल्याचे डॉ. वर्पे यांनी सांगितले. सरपंच चांगदेव ढोकचौळे, उपसरपंच निर्मलाताई जाधव, सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी गावातील सर्व लहान बालकांना जंतनाशक गोळ्या घेण्याचे आवाहन केले होते. याप्रसंगी डॉ. काजल वर्पे, आरोग्य सेविका योगीता बोर्डे, आरोग्य सेवक अनिकेत घुसिंगे, संध्या पवार, कलावती साळवे, सुनीता जमदाडे आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com