रांजणखोल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 4 तर सदस्यपदासाठी 24 उमेदवार रिंगणात

रांजणखोल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 4 तर सदस्यपदासाठी 24 उमेदवार रिंगणात

रांजणखोल |वार्ताहर| Rajankhol

राहाता तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या रांजणखोल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी चार तर सदस्यपदासाठी 24 उमेदवार रिंगणात आहेत.

अर्ज माघारीच्या दिवशी तीन उमेदवारांनी माघार घेतल्याने तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले. रांजणखोल ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच चांगदेव पाटील ढोकचौळे व वर्षा अमर ढोकचौळे यांनीही सरपंच निवडणुकीतून माघार घेतली. तर शोभा बाळासाहेब गायकवाड, विठ्ठल भानुदास दोंड व उपसरपंच निर्मला निलेश जाधव यांनीही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने गंगुबाई प्रभाकर लांडगे, सागर शिवाजी ढोकचौळे, कल्पना दिलीप यादव यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली.

रांजणखोल ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी चार तर सदस्यपदाच्या 10 जागांसाठी 24 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 13 जागेसाठी ही निवडणूक होणार होती पण तीन उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता दहा सदस्यपदाच्या जागासाठी ही निवडणूक होत आहे.

सरपंचपदासाठी ना. राधाकृष्ण विखे पाटील प्रणित जनसेवा मंडळातून शुभांगी बाळासाहेब ढोकचौळे तर राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून अनिता विठ्ठल विघावे, रांजणखोल परिवर्तन आघाडीकडून शोभा जगन्नाथ शिंदे व अपक्ष स्वाती योगेश शिंदे हे सरपंचपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. विशेष म्हणजे सरपंच चांगदेव पाटील ढोकचौळे यांनी मनाचा मोठेपणा दाखवत सरपंच निवडणुकीतून माघार घेतली तर उपसरपंच निर्मला निलेश जाधव यांनीही माघार घेतली.

जनसेवा मंडळ व वंचित बहुजन युवा आघाडी यांच्यातच अटीतटीची लढत होण्याची शक्यता दाट आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवारांना चिन्ह वाटप झाले असून त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. रविवार दि. 18 डिसेंबरला मतदान होणार असून 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com