रांजणखोल, एकलहरेत जोमात आलेले सोयाबीन गेले कोमात

चार्‍यांना तात्काळ पाणी सोडण्याची मागणी
रांजणखोल, एकलहरेत जोमात आलेले सोयाबीन गेले कोमात

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

मागील दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे जोमात आलेले सोयाबीन कोमात जात आहे. त्यामुळे तालुक्यातील एकलहरे, रांजणखोल कार्यक्षेत्रातील चारी नंबर 7 ला तात्काळ पाणी सोडण्याची मागणी शेतकर्‍यांमधून जोर धरू लागली आहे.

मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे हातातोंडाशी आलेले सोयाबीनसह अन्य पिके करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतकरी दिवसेंदिवस चिंतेत सापडत आहे. पाण्याअभावी आता पिकांसह, फळबागा वाळू लागल्या आहेत. परिसरात पाण्याअभावी पिकांबरोबर फळबाग देखील धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. येथील शेतकर्‍यांचे भवितव्य भंडारदरा धरणाच्या आवर्तनावर अवलंबून असते. परंतु पाणी वाटपाचे नियोजन न झाल्याने परिसरातील अनेक शेतकर्‍यांना याचा फटका बसलेला आहे. शेतातील विहीर, बोअरवेल यांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली असून ज्या शेतकर्‍याजवळ तुरळक पाणी आहे. ते शेतकरी आपल्या पिकांना तुषार सिंचनाद्वारे पाणी देऊन पिके जगविण्याचा प्रयत्न करत आहेत.

अलिकडच्या काळात कालवा सिंचनाचे शेतीसाठीचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. येत्या 1 ते 2 दिवसांत चार्‍यांना पाणी न सुटल्यास पिकांचा पाचोळा होणार आहे. सध्या भंडारदरा, निळवंडे धरणातून पिकांसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. हे आवर्तन सध्या टप्प्याटप्प्याने शेवटच्या टोकापासून शेतकर्‍यांचे भरणे चालू आहे. परिसरातील पिकांची बिकट अवस्था पाहता चारी नंबर 7 च्या माध्यमातून तात्काळ पाणी सोडण्याची मागणी चेअरमन अन्सार शेख, ज्येष्ठ पत्रकार लालमोहंमद जहागीरदार, सरपंच रिजवाना शेख, उपसरपंच रमेश कोल्हे, आर. आर. पाटील, ग्रामपंचायत सदस्य सागर ढोकचौळे, दिलीप अभंग, रामू ढोकचौळे, भाऊसाहेब ठोंबरे, सचिन ढोकचौळे, गोपाल लांडगे, इमान सय्यद, साबीर सय्यद, समीना जहागीरदार, हरीश कुर्‍हे, आदेश गिरमे, आकाश गिरमे, रवी निर्मळ, मलिक जहागीरदार, खलीक जहागीरदार, बाळकृष्ण गिरमे यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकर्‍यांनी केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com