रांजणगाव खुर्दमध्ये अपहरण करून तरुणाला बेदम मारहाण

राहाता पोलिस ठाण्यात 6 ते 7 जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा
रांजणगाव खुर्दमध्ये अपहरण करून तरुणाला बेदम मारहाण

राहाता |प्रतिनिधी| Rahata

राहाता तालुक्यातील रांजणगाव खुर्द शिवारात एका 32 वर्षीय तरुणाचे अपहरण करुन उसाचे शेतात घेऊन जात जातीयवाचक शिवीगाळ करत अमानुष मारहाण केल्याची घटना घडली. रवींद्र अशोक लोंढे असे जखमी तरुणाचे नाव असून मारहाणीत त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात सहा ते सात जणांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच राहाता पोलिसांनी तातडीने रांजणगाव परिसरात रवींद्रचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींना चाहूल लागताच त्यांनी रवींद्र लोंढे यांना त्या ठिकाणी दुसरीकडे नेले. त्यानंतर आरोपींनी लोंढे यांना लाकडी दांडा आणि धारदार शस्रांनी अमानुष मारहाण केली. पोलिसांत तक्रार केली तर जीवे मारून टाकू, अशी धमकी देत राहाता शहरातील पाटील हॉस्पीटलसमोर टाकून दिले. काल शुक्रवारी सकाळी कुटूंबीय जखमी रवींद्र लोंढे यांना घेऊन फिर्याद देण्यासाठी राहाता पोलीस ठाण्यात हजर झाले. यावेळी घटनेची माहिती मिळताच परिसरातील कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली.

रवींद्र लोंढे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी राहाता ते चितळी जाणारे रोडवर एकल शिवारातील अमोल माधव मासाळ यांचे यशराज हॉटेलवर सहा महिन्यांपासून वेटर म्हणून काम करतो. सदर हॉटेलवर रांजणगाव येथील पप्पू उर्फ सुनील बाळासाहेब गाढवे हा त्याचे मित्रांसोबत जेवणासाठी नेहमीच येत असतो. गावातील असल्याने त्याला ओळखतो. 30 जून रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास मी व हॉटेल मालक अमोल माधव मासाळ असे आम्ही दोघे हॉटेलमध्ये असताना पप्पू उर्फ सुनील गाढवे हा हॉटेलमध्ये आला व पाण्याची बाटली घेवून हॉटेलमध्ये पाणी पिला.

त्यानंतर मालक अमोल मासाळ व मी त्यास म्हणालो की, तुझ्याकडे हॉटेलची 10,000 रुपये उधारी झाली आहे. तेवढी उधारी आम्हाला देवून टाका. तेव्हा तो म्हणाला की, मी काय पळून चाललो का, माझ्याकडे येईल त्यावेळेस देईल. हॉटेलजवळील शेतात लघवीसाठी गेला. तेथे दत्तात्रय रंगनाथ गाढवे यांनी शेतात महिला काम करत आहे येथे लघवी करू नका असे म्हणताच त्याने दत्तात्रय गाढवे यांचेशी भांडण करू लागला. त्यामुळे मी व अमोल मासाळ असे दोघे तेथे गेलो व सोडवासोडव केली.

त्यानंतर पप्पू उर्फ सुनील गाढवे हा त्या ठिकाणाहून निघून जाताना म्हणाला, लयी भांडण सोडवणारा झाला का? पुन्हा सायंकाळी 7 वा. पप्पू गाढवे व त्याचे साथीदार हॉटेलमध्ये आले आणि मला त्यांनी हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या दत्तू देवराम चव्हाण याचे उसाचे शेतात ओढीत घेवून गेले. त्यावेळी अमोल मासाळ म्हणाला की, तुम्ही असे काय करता. त्यावेळेस पप्पू गाढवे त्यास म्हणाला की, तू तुझे काम कर तुला काय करायचे असे म्हणून त्याने त्याला तेथील एक दगड उचलून फेकून मारला. त्यांनी मला उसात नेल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या ओळखीचे शंभु सारंगधर मोटकर, नवनाथ उर्फ सोमनाथ सदाशिव साबारे हेही त्या ठिकाणी आले. अशा सर्वांनी एकत्रीत आल्यानंतर त्यांनी येतानाच हातामध्ये लाकडी दांडा व लोखडी कत्ती आणली होती. पप्पू गाढवे आणि त्याच्या साथीदारांनी त्याचे हातातील लाकडी दांडयाने व कत्तीने वार करून जखमी केले. जातीवाचक शिवीगाळ करून पुन्हा लाथाबुक्यांनी मारहाण केली.

फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी पप्पू उर्फ सुनिल बाळासाहेब गाढवे, अमोल वेणूनाथ मासाळ, अशोक दिलीप गाढवे सर्व रा. रांजणगाव खुर्द, आकाश मनोज पाडांगळे, रा. चोळकेवाडी, शंभु सारंगधर मोटकर, रा. पुणतांबा, नवनाथ उर्फ सोमनाथ सदाशिव सांबारे, रा. रामपूरवाडी यांचे विरोधात भादंवी कलम 326, 323, 143, 147, 148, 504, 506 व अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट 3 (1) (ठ) (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com