
पिंपरी निर्मळ |वार्ताहर| Pimpari Nirmal
पावसाळ्याचे चार महिने संपले. परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. या मान्सुनच्या चार महीन्यात पावसाने दमदार हजेरी न लावल्याने राहाता तालुक्यात खरीपाची पिके वाया गेली असुन चांगल्या पावसा अभावी रब्बीही संकटात आहे. तालुक्यात सराससरीच्या अवघा 62 टक्के पाऊस झाला असुन खरीपाची पिके जळुन गेल्यावर यातील बहुंताशं पाऊस सप्टेबरच्या शेवटच्या आठवडयात झाला आहे. तर बाभळेश्वर मंडळात अवघा 55 टक्के पाऊस झाल्याने शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
जूनमध्ये पावसाळ्यास सुरवात होऊन जुन ते सप्टेबर असा चार महीन्यांचा पावसाळ्याचा कालखंड संपला आहे. या चार महिन्यात राहाता तालुक्यातील पाचही मंडळात अवघा 60 टक्के पाऊस झाला. यातील बहुतांश पाऊस शेवटच्या सप्टेबर महीन्याच्या अखेरच्या आठवड्यात झाला आहे. मात्र यापूर्वीच खरीपाचे पिके जळुन गेली होती. सध्या झालेला पाऊसही अल्प असुन या ओलीवर रब्बीच्या थोड्याफार पेरण्या होतील. मात्र दमदार पावसा अभावी विहीरी व बोअरवेल कोरडे ठाक पडले असल्याने रब्बीची पिकेही संकटात आहेत.
परतीच्या पावसास सध्या सुरुवात झाली असून यामध्ये चांगला पाऊस झाल्यास रब्बीला आधार येणार आहे. मात्र तसे न झाल्यास खरीपाबरोबर रब्बीची पिके वाया जावुन शेतकरी दुहेरी संकटात सापडणार आहे. तालुक्यात जुन ते सप्टेबर महिन्यात तालुक्यात सरासरी 500 मीमी पाऊस होतो. मात्र या चार महीन्यात सरासरी 320 मीमी पाऊस झाला आहे. त्यामध्ये लोणी मंडळात सर्वाधीक 375 मीमी (75 टक्के) तर बाभळेश्वर मंडळात सर्वात कमी 285 मी. मी ( 55टक्के) शिर्डी मंडळात 300 मीमी (60टक्के),राहाता मंडळात 318 मी.मी(62 टक्के) पुणतांबा मंडळात 325 मीमी ( 65 टक्के) पाऊस झाला आहे. चालु वर्षी पावसामध्ये प्रंचड लहरीपणा दिसुन आला आहे. दर दोन कीमी वर पावसाचे प्रमाण वेगवेगळे दिसून आले आहे. ज्या ठीकाणी पर्जन्यमापक आहेत त्याच ठीकाणी पाऊस झाल्याने बर्याच मंडळाची पावसाची आकडेवारी वाढुन गेली आहे.
तालुक्यात सरासरी 500 मी.मी पाऊस पडत असला तरीही गेल्या तीन चार वर्षा पासुन तालुक्यात पावसाने सरासरी 700 मी.मी चा टप्पा ओलांडला होता. मात्र चालु वर्षी सरासरी अवघा 320 मी.मी पाऊस झाल्याने खरीपा नंतर रब्बी हंगामाच्या यशस्वीतेबाबद प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याच बरोबर पशुधनाच्या चार्याचाही प्रश्न बिकट झाला आहे. सध्यातरी परतीच्या पावसावर बळीराजाचे भवितव्य अवलंबून आहे.