पावसाने दडी मारल्याने एकलहरे परिसरात पेरण्या खोळंबल्या

पावसाने दडी मारल्याने एकलहरे परिसरात पेरण्या खोळंबल्या

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

तालुक्यात दमदार पावसाने अद्यापही हजेरी न लावल्याने एकलहरे परिसरात पेरण्या खोळंबल्या असून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पाऊस येत नसल्याने शेतकरी तसेच शेतमजूर हतबल झाला आहे. त्यामुळे सर्वच व्यवसायांवर मंदीचे सावट पसरले आहे.

ज्या शेतकर्‍यांकडे विहिरीत पाण्याची उपलब्धता आहे अशा शेतकर्‍यांनी पाणी भरून पेरणीचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र वातावरणात मोठा उष्मा असल्याने त्या पेरण्या किती यशस्वी होतील याबाबत शंका आहे. पावसाअभावी जनावरांनाही चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मेंढपाळ वर्ग त्रस्त झाला असून सर्वांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे.

जून महिना निम्मा संपूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. तसेच काही दिवसांपासून उन्हाचा कहर सुरू असून घामांच्या धारांनी नागरिक हैराण झाले आहेत. दिवसभर प्रचंड उन्हाचा तडाखा जाणवत असून, सायंकाळी सुटत असलेल्या वार्‍याने पावसाची दिशा बदलली आहे. पावसामुळे शेतीची कामे खोळंबली असून बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. तालुक्यात अजूनही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने खरीपातील पेरण्या रखडल्या आहेत.

सध्या तालुक्याची शेतीची तहान भंडारदरा, निळवंडेच्या धरणाच्या माध्यमातून भागवली जात असली तरीही शेतीसह जनावरांच्या पाण्याचा, चार्‍याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकर्‍यांना आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com