पाऊस मंदावला, विसर्ग घटले !
सार्वमत

पाऊस मंदावला, विसर्ग घटले !

गंगापूर 84.51 टक्के भरले । विसर्ग : दारणा- 4164, गोदावरीत 6456 क्युसेक

Arvind Arkhade

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

काल दिवसभर पाऊस मंदावल्याने धरणातील विसर्ग घटले आहेत. त्यामुळे नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्गही 6456 क्युसेकवर आला. दारणाचा विसर्ग काल सायंकाळी 6 वाजता 4164 क्युसेकवर आला होता. गंगापूर धरणाचा साठा काल 83.44 टक्के झाला होता. तर खाली जायकवाडी जलाशयात 67.40 टक्के उपयुक्तसाठा तयार झाला होता.

दारणा धरणाच्या पाणलोटात काल सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी अधूनमधून बरसत होत्या. त्यामुळे नवीन पाण्याची आवक मंदावली होती. काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासांत दारणाला अवघा 4 मिमी पावसाची नोंद झाली. पाणलोटातील इगतपुरीला 78, घोटीला 30 मिमी पावसाची नोंद झाली.

भावलीच्या भिंतीजवळ 60 मिमी पावसाची नोंद झाली. 24 तासांत 611 दशलक्ष घनफूट नवीन पाणी दाखल झाले. भावलीतून 290, भाम मधून 1690 क्युसेकने विसर्ग दारणाच्या दिशेने प्रवाहित होत आहे. काल सकाळी 5378 क्युसेकने विसर्ग सुरू होता. तो काल पाच वाजेपर्यंत टिकून होता. त्यानंतर तासाभरात सायंकाळी 6 वाजता तो 4164 क्युसेक वर आणण्यात आला.

दारणातील विसर्ग घटला आणि पाणलोटातही पावसाने विश्रांती घेतल्याने नांदूरमधमेश्वर बंधार्‍यात नवीन पाण्याची आवक कमी झाल्याने या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत सोडण्यात येणारा विसर्ग घटविण्यात आला आहे.

काल सकाळी 6 पासुन गोदावरीत 6456 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तो काल रात्री उशीरा पर्यंत टिकून होता. काल सकाळी 6 पर्यंत जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत या बंधार्‍यातून 1 लाख 24 हजार 228 क्युसेक एकूण विसर्ग करण्यात आला आहे. 10737 दशलक्ष घनफूट म्हणजेच पावणेअकरा टीएमसी पाण्याचा विसर्ग आता पर्यंत नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून करण्यात आला आहे.

गंगापूर 84.51 टक्के

गंगापूर धरणाच्या पाणलोटात काल पावसाने दिवसभर विश्रांती घेतली होती. मात्र काल सकाळी संपलेल्या 24 तासांत गंगापूरला 55, अंबोलीला 62, त्र्यंबक 28 मिमी पाऊस नोंदला आहे. 24 तासांत गंगापूर मध्ये 168 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. 5630 क्षमतेच्या गंगापूर मध्ये 4697 दलघफू पाणीसाठा तयार झाला आहे. हा साठा 83.43 टक्के इतका झाला होता. सायंकाळी 6 वाजता गंगापूर चा साठा 84.51 टक्के इतका झाला होता. काल सायंकाळी सहा वाजता संपलेल्या 12 तासांत गंगापूरला 10, त्र्यंबकला 7, तर अंबोलीला 20 मिमी पावसाची नोंद झाली. काश्यपीला सकाळी 6 पर्यंत 57 मिमी पावसाची नोंद झाली. या धरणात 64 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. हे धरण 44.22 टक्के भरले आहे. तर गौतमी गोदावरी धरणाच्या पाणलोटात 28 मिमी पावसाची नोंद झाली. तर 43 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. हे धरण 53.46 टक्के भरले आहे.

जायकवाडी 67.70 टक्के !

जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजेपर्यंत 15516 क्युसेकने नवीन पाणी दाखल होत होते. काल पावसाने काही ठिकाणी विश्रांती घेतल्याने आवक घटली होती. सायंकाळी 6 वाजता जायकवाडीत 67.70 टक्के उपयुक्तसाठा तयार झाला होता. उपयुक्त पाणी 51.9 टीएमसी इतके तर मृतसह एकूण साठा 77.9 टीएमसी इतका तयार झाला होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com