पावसाच्या उघडीपीने शेतीच्या कामांना वेग

उत्पादनवाढीसाठी शेतकर्‍यांचे प्रयत्न
पावसाच्या उघडीपीने शेतीच्या कामांना वेग

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

तालुक्यातील एकलहरे, रांजणखोल, उक्कलगाव परिसरात दोन तिन दिवसांपासून पावसाने उसंत घेतली असून शेतकरी शेतीच्या कामाला लागला आहे. दहा दिवसांपासून संततधार पावसामुळे शेतकर्‍यांना कीटकनाशक, तणनाशक फवारणी व आंतरमशागतीची कामे करता आली नाहीत. आता पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने शिवारात शेती कामांची लगबग सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत असून सध्या तणनाशक व किटकनाशक फवारणीला वेग आला आहे.

परिसरात गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस सुरु असल्याने खरीप हंगामातील आंतरमशागतीची कामे खोळंबली होती. त्यात सततच्या पावसाने सोयाबीनसह अन्य पिके पिवळी पडली. तर शेतात मोठ्या प्रमाणात तण आले आहे. आता पावसाने उघडीप दिल्याने आठवड्यानंतर सुर्यदर्शन झाल्याने शेतकरी सुखावला असून आंतरमशात करण्यात व्यस्त झाला आहे.

यंदा परिसरात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाची पेरणी केली आहे. पावसामध्ये सातत्य राहिल्याने पिकांमध्ये तण वाढले आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होतो. चार दिवसांपासून परिसरात पावसाने उसंत घेतल्याने शेतकर्‍यांच्या मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मका,बाजरी, सोयाबीनची खुरपणी व कोळपणीची लगबग सुरू आहे.

पावसामुळे शेताकडे फिरकणेही शक्य न झाल्याने उघडीप दिलेल्या पावसामुळे दिवस उजाडला की शेतकरी मशागतीची कामे करीत आहे. योग्य वेळी योग्य ती मशागत झाली तर पिकांची वाढ झपाट्याने होणार आहे. शिवाय सततच्या पावसामुळे पिकांच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे रखडलेली कामे आणि उत्पादनवाढीच्या अनुशंगाने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. यातच ऑगस्टच्या सुरुवातीलाच पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे मिळालेल्या वेळेत कामे उरकून घेण्यावर शेतकर्‍यांचा भर राहणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com