मान्सून अचानक गायब भंडारदराचा विसर्ग बंद

घाटघरला 9, रतनवाडीत 8 इंच पाऊस
मान्सून अचानक गायब भंडारदराचा विसर्ग बंद

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

उत्तर नगर जिल्ह्यातील शेतीचे भवितव्य आणि आर्थिक कणा असलेल्या भंडारदरा पाणलोटात सोमवार सकाळपर्यंत धो धो पाऊस झाला. घाटघरला तब्बल 226 तर रतनवाडीत 193 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाच्या मेहरबानीमुळे काल सकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदरा धरणात 24 तासांत 681 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. मात्र त्यानंतर काल दिवसभर पाऊस पाणलोटातून अचानक गायब झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. परिणामी आवक मंदावल्याने भंडारदातील सोडण्यात येणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

गत चार पाच दिवसांपासून पाणलोटात मान्सून सक्रिय झाल्याने नवीन पाण्याची आवक होत होती. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेचे धरण पूर्ण क्षमतेने भरले. रविवारी रात्रीपासून पाणलोटात धो धो पाऊस सुरू झाला. त्यामुळे डोंगरदर्‍यातील धबधब्यांनी आक्राळविक्राळ रूप धारण केले होते. ओढे नाल्यातून पाण्याचे लोंढे धरणाकडे झेपावत होते. पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने काल सायंकाळी भंडारदरा धरणातून 7678 तर निळवंडेतून 7800 क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते.

प्रवरा नदी दुथडी वाहु लागली होती. विसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेऊनदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे लाभक्षेत्रात आशादायी चित्र झालेले असतानाच काल सोमवारी सकाळपासून पाणलोटातून पावसाने अचानक ‘एक्झीट’ घेतली. सर्वत्र ऊन पडले.त्यामुळे धरणाकडे येणारी आवकही मंदावली. परिणामी स्पीलवेतून सोडण्यात येणारा विसर्ग दुपारी 2 वाजता बंद करण्यात आला. या अचानक बदलामुळे पाणलोटातील शेतकरीही हैराण झाले आहेत.

भंडारदरातील आवक मंदावल्याने सहाजिकच निळवंडे धरणाकडे होणारी आवकही थांबली आहे. त्यामुळे या धरणातून सोडण्यात येणारा विसर्गही 1650 क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला आहे. वाकी तलावाचाही विसर्ग केवळ 98 क्युसेक सुरू आहे.

परतीचा पाऊस 17 सप्टेंबरपासून

यंदा समाधानकारक पाऊस नसताना मान्सूनच्या परतीचा प्रवास निश्चित झाला आहे. यंदा मान्सूनचा परतीचा प्रवास पूर्व राजस्थानमधून सुरू होणार आहे. 17 सप्टेंबरपासून हा प्रवास सुरु होणार आहे. महाराष्ट्रातून मान्सूनचा प्रवास उशिराने म्हणजे 5 ते 8 ऑक्टोबर दरम्यान होईल. लंडनमधील हवामान शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी ही माहिती दिली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com