पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या

बियाणे, खते खरेदी करून शेतकर्‍यांच्या नजरा वरूणराजाकडे
पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या

करंजी |वार्ताहर| Karanji

यावर्षी मान्सून वेळेत दाखल झाला असे हवामान खात्याने सांगितले असले तरी पाथर्डी तालुक्यात मात्र 16 जून उलटला तरी देखील कुठेही पेरणीयुक्त पावसाने हजेरी न लावल्यामुळे बळीराजा अस्वस्थ आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना वरूण राजाचे वेळेत आगमन झाले असते तर काहीसा दिलासा मिळाला असता. परंतु अर्धा जून उलटला तरीदेखील तालुक्यात कुठेही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागले आहेत. अनेक शेतकर्‍यांनी खते, बी-बियाणे खरेदी करून ठेवली आहेत. आता शेतकर्‍यांच्या नजरा वरूण राजाच्या आगमनाकडे लागले आहे.

वरूण राजाने लवकर या दुष्काळी तालुक्यात हजेरी लावावी, चांगली दमदार सुरुवात करावी अशी मोठी अपेक्षा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वतीने चेअरमन बाळासाहेब लवांडे, भारत गारुडकर, नामदेव सोलाट, बलभीम बनकर, विजय गुंड, महादेव आकोलकर, विनायकराव पाठक, देवीदास शिंदे यांच्यासह शेतकर्‍यांना लागून राहिली आहे.

डोंगर पट्ट्यात दडी

तालुक्यात कपाशी, बाजरी, तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात पेरणी केली जाते. जर वेळेत वरुणराजाने हजेरी लावली तर काही शेतकरी मूग, उडीद, मठ याची देखील पेरणी करतात. परंतु अजूनही कुठे वरुणराजाने हजेरी न लावल्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहे. करंजी, दगडवाडी, वैजूबाभूळगाव, सातवड वृद्धेश्वर, कोल्हार, डमाळवाडी, गितेवाडी, डोंगरवाडी, उदरमल या डोंगर पट्ट्यातही पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com