
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास नगर तालुक्यातील जेऊर परिसरात पावसाने जोरदार सलामी दिली. यावेळी ढगफुटी सदृश पाऊस झाला. यामुळे सीना नदीला पूर आला होता. जोरदार झालेल्या या पहिल्याच पावसाचे पाणी पिंपळगावच्या तलावात पोहचले असून यामुळे तलावातील पाणी साठा वाढला आहे. दरम्यान, जेऊर परिसरात दीड तासांत 140 मिली मीटर पावसाची नोंद झाली असून सीना नदीचे पाणी जेऊर गावातील दुकानात शिरल्याने व्यावसायिकांचे नुकसान झाले.
नगर तालुक्यातील जेऊर, ससेवाडी, बहिरवाडी, इमामपूर, आढाववाडी, डोंगरगण परिसरात शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला असून पहिल्याच पावसात या परिसरातील सर्व बंधारे तुडूंब भरले आहेत. मात्र, दुसरीकडे या मुसळधार पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान केले आहे. शेतकर्यांचे बांध मोठ्या प्रमाणात फुटले असून सीना नदीच्या पुरामुळे जेऊर गावच्या बाजारपेठेतील दुकानांनी पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी झालेल्या जोरदार वादळामुळे परिसरातील अनेक मोठमोठाले वृक्ष, विद्युत लाईनचे पोल, महामार्गालगतचे फ्लेक्स बोर्ड पडले आहेत.
तसेच सिना नदीच्या पुराचे पाणी महामार्गावरील पुलावरून गेल्याने नगर औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्गावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. ढगफुटी सदृश झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक रस्ते, पूल, शेतीचे बांध वाहून गेले आहेत. तर सीना, खारोळी नदी व परीसरातील सर्व ओढे तुडूंब भरून वाहत असल्याने पिंपळगाव माळवी तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे.
ससेवाडी तसेच चापेवाडी येथील नागरिकांचा महापुरामुळे संपर्क तुटला होता. बहिरवाडी येथील वाकी तलाव, इमामपूर येथील उपळ तलाव, पालखी तलाव तसेच शेटे वस्ती येथील तलावात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. मागील वर्षी जेऊर परिसरात ढगफुटी होऊन सीना व खारोळी नदीला आलेल्या महापुरामुळे बाजारपेठेत पाणी घुसून मोठ्या प्रमाणात व्यावसायिक, रस्ते, पूल शेतकर्यांचे बांध वाहून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्रशासनाने तात्काळ दखल घेत नुकसानीचे पंचनामे केले. मात्र अद्याप कुणालाही मदत मिळालेली नाही. आजच्या पावसाने पुन्हा मागील वर्षी झालेल्या पूर परिस्थितीच्या आठवणीला उजाळा मिळाला आहे.