
पाचेगाव |वार्ताहर| Pachegav
यंदा उशिरा आलेल्या मान्सूनमुळे नेवासा तालुक्यातील शेतकर्यांनी खरिपाच्या पेरण्या उशिरा केल्या होत्या. जेमतेम ओलीवर पेरण्या उरकल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली होती. त्यामुळे पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीन, बाजरी, कापूस, तूर, भुईमूग आदी खरीप पिके पावसाअभावी सुकून वाळून गेली.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नेवासा तालुक्यातील आठ महसूल मंडळांपैकी सलाबतपूर, वडाळा, कुकाणा आणि नेवासा खुर्द ही चार महसूल मंडळे 25 टक्के अग्रीम पिकविम्यासाठी पात्र ठरली होती. या मंडळांतील गावात पिकांचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र पंचवीस दिवसापेक्षा अधिक दिवस पावसाचा सलग खंड आणि पावसाअभावी खरीप पिके वाळून गेलेली असतानाही नेवासा बुद्रुक महसूल मंडळ 25 टक्के अग्रीम पीकविमासाठी पात्र न ठरल्याने शेतकर्यांनी गत आठवड्यात जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि कृषी अधिकार्यांना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता.
अखेर प्रशासनाने मंडळातील शेतकर्यांच्या निवेदनाची दखल घेत सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बेलपिंपळगावचे कृषी सहायक निलेश बिबवे, पाचेगावचे कृषी सहायक विकास बाचकर, विमा कंपनीचे प्रतिनिधी यांनी पाचेगाव, पुनतगाव, बेलपिंपळगाव, घोगरगाव, जैनपूरसह मंडळांतील गावात खरीप पिकाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यामुळे सरसकट 25 टक्के अग्रीम पीकविमा भरपाई मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून या मंडळातील शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पीक विमा कंपनी कडून गावातील साधारण दहा शेतकरी निवडून रेंन्डम पद्धतीने नुकसान पीक पाहणी करून पीक विमा प्रतिनिधी पीक विमा कंपनीला अहवाल सादर करणार,त्या अनुषंगाने इतर गावातील शेतकर्यांच्या पीक नुकसान ठरणार. त्यामुळे गावातील शेतकर्यांच्या पीक विमा कंपनीकडून तातडीने देणार्या 25 टक्के अग्रीम पिकविम्यासाठी पात्र ठरल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.