
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात म्हणजेच जून 2022 पासून अतिवृष्टी, सततचा पाऊस, अवेळी झालेला पाऊस, वादळी वारे, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीमुळे 5 लाख 89 हजार 373.47 हेक्टर क्षेत्रातील 10 लाख 7 हजार 946 शेतकर्यांचे एकूण 1 हजार 142 कोटी 58 लाखांचे नुकसान झाले. त्यापैकी आत्तापर्यंत केवळ 166 कोटी 75 लाख रुपयांची भरपाई शेतकर्यांना मिळाली आहे.
कृषी विभागाच्या खरीप हंगाम पूर्व नियोजन आढावा पुस्तिकेत ही माहिती देण्यात आली आहे. मागील आवठड्यात शनिवारी नगरला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. त्यावेळी कृषी विभागाने या आकडेवारीचे सादरीकरण केले. जून ते ऑगस्ट 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे 2 हजार 319.50 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. बाधित शेतकर्यांची संख्या 21 हजार 410 आहे.
त्यासाठी 4 कोटी 25 लाख 91 हजार रुपयांची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. त्यापैकी 4 कोटी 8 लाख 98 हजार रुपयांचे 21 हजार 119 शेतकर्यांना वितरण करण्यात आले. 16 लाख 93 हजार रुपये पुन्हा विभागीय आयुक्तांकडे परत पाठवण्यात आले. ऑगस्ट ते सप्टेंबर 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे 1 लाख 64 हजार 496.13 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यातील शेतकर्यांची संख्या 2 लाख 74 हजार 630 होती. त्यासाठी 366 कोटी 84 लाख रुपयांची मागणी करण्यात आली. पैकी 162 कोटी 66 लाख 65 हजार रुपयांची रक्कम 1 लाख 34 हजार 85 शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आली.
ऑगस्ट ते सप्टेंबर 2022 मध्ये सततच्या पावसाने 3 लाख 93 हजार 575.93 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. बाधित शेतकर्यांची संख्या 6 लाख 56 हजार 473 होती. त्यासाठी 786 कोटी 96 लाख 29 हजार रुपयांची राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली. हे अनुदान अद्याप अप्राप्त आहे.
मार्च 2023 मध्ये अवेळी पाऊस, वादळी वारे व गारपिटीमुळे 6036.77 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यातील शेतकरी संख्या 11 हजार 793 होती. त्यासाठी 10 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. हेही अनुदान अद्याप शेतकर्यांना मिळालेले नाही. एप्रिल 2023 मधील 7 ते 16 एप्रिल या कालावधीत अवेळी पाऊस, वादळी वारे व गारपिटीमुळे 19 हजार 855.72 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यातील शेतकरी संख्या 34 हजार 458 होती. एकूण त्यासाठी 34 कोटी 50 लाख रुपयांची मागणी नोंदवण्यात आली.
हेही अनुदान अद्याप अप्राप्त आहे तर 20 एप्रिल ते 30 एप्रिल 2023 या कालावधीत अवेळी पाऊस, वादळी वारे, गारपीट यामुळे 490.10 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. त्यातील शेतकर्यांची संख्या 9 हजार 182 आहे. त्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असेही कृषी विभागाच्या पुस्तिकेत नमूद करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त जून 2022 ते एप्रिल 2023 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे 10 मृत्युमुखी पडले, दोनजण जखमी झाले, 50 जनावरे मृत्युमुखी पडली तर नुकसान झालेल्या घरांची संख्या 1 हजार 112 आहे. या नैसर्गिक आपत्तीबद्दल किती नुकसान भरपाई प्राप्त झाली, त्याचा उल्लेख पुस्तिकेत करण्यात आलेला नाही.
शेतकर्यांच्या मदतीकडे नजरा
राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती आणि दर 15 ते 20 दिवसांनी पडणारा अवकाळी पाऊस यामुळे नगर जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे वाढणारा आकडा दर महिन्याला वाढताना दिसत आहे. या नैसर्गिक आपत्तीमध्ये बळी पडलेल्या शेतकर्यांच्या पदरी सरकारची भरीव आर्थिक मदत कधी पडणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकमंत्री विखे यांच्या खरीप हंगाम पूर्व तयारीच्या बैठकीत जिल्हाधिकारी सिध्दीराम सालेमठ यांनी जिल्ह्यात दिवाळीनंतरच्या झालेल्या सततच्या पावसाची भरपाई मिळाली नसल्याचे मान्य केले होते. तर काही सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी यावर आवाज उठवला होता. आता शेतकर्यांच्या नजरा सरकारच्या मदतीकडे आहेत.