आर्द्रातील पावसाने नर्सर्‍या तरारल्या !

आर्द्रातील पावसाने नर्सर्‍या तरारल्या !

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

आर्द्रा नक्षत्रातील पावसाने अस्तगाव परिसरातील नर्सर्‍या तरारल्या आहेत. पावसाचे आगमन होताच रोपे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे.

अस्तगाव भागात नर्सरी उद्योगाचे हब बनले आहे. विविध नर्सर्‍या विविध रोपांसह परिसरात डौलाने उभ्या आहेत. गेल्या उन्हाळ्यात दुष्काळाची तीव्रता फारशी जाणवली नसली तरी पाऊस पडल्याशिवाय रोपे खरेदी करण्यासाठी ग्राहक रोपवाटिकांकडे वळत नाहीत. रविवारी दुपारनंतर अस्तगाव परिसरात पावसाचे आगमन झाले. आर्द्रातील पावसाने बर्‍यापैकी हजेरी लावल्याने येथील नर्सर्‍या फुलल्या आहेत. नगर जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी आर्द्राच्या या पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने ग्राहक रोपे खरेदीसाठी अस्तगावला दाखल होत आहेत.

अस्तगावच्या नर्सर्‍यांमध्ये हवी ती रोपे ग्राहकांना मिळत आहेत. गेल्या काही वर्षापासून डाळिंब, पेरू, आंबा यासारखी रोपेही मुबलक मिळत असल्याने या रोपांच्या खास नर्सर्‍या या भागात आहेत. एका एका नर्सरीत लाखांच्यावर रोपे विक्रीस उपलब्ध आहेत. डाळिंबाची रोपे खरेदी करण्यासाठी आजुबाजूच्या पाच सहा जिल्ह्यांसह गुजरात राज्यातही ही रोपे लागवडीसाठी जातात. पावसाच्या पाण्यात नैसर्गिकरित्या नायट्रोजन असल्याने दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने रोपे तरारल्याचे दिसून येत आहे.

फळांच्या रोपांबरोबरच येथील नर्सरींमध्ये फुलांच्या, शोभिवंत झाडांची तसेच औषधी वनस्पतींचीही रोपे मिळत आहेत. बंगल्यासमोर लागणारी सर्व शोभिवंत रोपे अस्तगावच्या नर्सर्‍यांमध्ये मिळत आहेत. याशिवाय गार्डन तयार करणारे, कलम करणारे तरुणही येथे उपलब्ध आहेत. नर्सरी उद्योगामुळे अस्तगावचे 500 ते 600 तरुण या व्यवसायात आहेत. महिलांनाही रोजगार मिळतो. शिर्डीसारखे तिर्थक्षेत्र जवळ असल्याने दुरवरचे ग्राहक या रोपांना मिळतात. परंतु मागील वर्षापासून दूरवरून विशेष करून साईभक्त येत नाहीत. जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील ग्राहक या नर्सरींमध्ये रोपे खरेदीसाठी येतात.

नगर जिल्ह्यातील ग्राहक रोपे खरेदीसाठी अस्तगावला नर्सर्‍यांमध्ये दाखल होत आहेत. दुष्काळाच्या परिस्थितीत ही आम्ही टँकरने पाणी आणून रोपे जगवितो. यावर्षी दुष्काळाची तीव्रता नसली तरी ग्राहकांना चांगली रोपे उपलब्ध करून देण्यासाठी सर्व नर्सरीधारक चांगली निगा राखतात. सर्व प्रकारची फळझाडे, फुलझाडे, शोभिवंत झाडे आम्ही ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत असतो.

- सुनील त्रिभान, अक्षय नर्सरी

वर्षभरापासून करोना काळातील लॉकडाऊनचा फटका नर्सरी उद्योगालाही काही अंशी बसला. काही प्रमाणात ग्राहक घटले होते, आता पावसाने ग्राहक वाढले आहेत. ग्राहकांना हवी ती रोपे मिळत असल्याने अस्तगावला नर्सरी उद्योगच तयार झाला आहे.

- शरद निमसे, सह्याद्री नर्सरी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com