संततधार पावसाने पाचेगाव परिसरातील पिके तरारली; शेतकरी सुखावला

संततधार पावसाने पाचेगाव परिसरातील पिके तरारली; शेतकरी सुखावला

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नगर जिल्ह्यात दोन-तीन दिवसांपासून पावसाने सर्वदूर हजेरी लावली. त्यात नेवासा तालुक्यातील पश्चिमेकडे असणार्‍या पाचेगावमध्ये शुक्रवारी सकाळपासून आकाशात ढगाळ वातावरण तयार होऊन सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली. तीन दिवस पडलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळून पिके टवटवीत दिसू लागल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावरही समाधान दिसू लागले आहे.

पाचेगाव, कारवाडी व पुनतगाव भागत पेरणीनंतर पावसाला मोठा खंड पडला होता. त्यात शेतकर्‍यांनी खरिपातील घेतलेल्या सोयाबीन, कपाशी व मका कोवळी पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता होती, त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पण तीन दिवसांपासून या भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील पिकांना एकप्रकारे जीवदान मिळाले असून शेतकर्‍यांमध्ये आनंदी आनंद झाला आहे.

तीन दिवसांत आतापर्यंत 54 मिलीमीटर पावसाची नोंद या भागात झाली आहे. यावर्षीच्या पावसाळ्याच्या आतापर्यंतच्या कालखंडात 185 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळण्याबरोबरच विहिरी व बोअरवेलच्या पाणी पातळीमध्ये देखील वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भंडारदरा व निळवंडे धरणावर देखील पावसाचा जोर चांगला असल्याने धरणात नवीन पाण्याची आवक होत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांसाठी ही बातमी देखील आनंदाची आहे.

या भागात पेरणीनंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले होते. एक तर यावर्षी सोयाबीन बियाण्याच्या दरामध्ये खूप वाढ झाली. त्यात पाऊस पेरणी नंतर उघडला. शेतकर्‍यांवर दुबार पेरणी संकट ओढले जाते की काय अशी धास्ती घेतली होती, पण तीन दिवसांपासून संततधार चाललेल्या पावसाने या भागातील शेतकरी सुखावला आहे.

मागील वर्षीपासून सोयाबीनचे दर बर्‍यापैकी असल्याने पाचेगाव परिसरात सोयाबीन, कपाशी पेरणी व लागवडी मोठ्या प्रमाणावर झाल्या आहेत. दर टिकून राहिल्याने शेतकरी वर्गाने सोयाबीन पेरणीवर जास्त भर दिला. पिकांना जीवदान मिळाल्याने या भागातील शेतकर्‍यांमध्ये आनंदी आनंद दिसत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com