
अहमदनगर (प्रतिनिधी)
ऐन दिवाळीच्या तोंडावर शुक्रवारी सायंकाळी नगर शहर आणि परिसरात सुमारे पाऊण ते एक तास पावसाने धुतले. अचानक आलेल्या पावसामुळे खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नगरकरांची चांगलीच तारांबळ उडाली. या बेमोसमी पावसामुळे बाजारपेठेतील व्यावसायिक, फटाका विक्रेते यांचे देखील मोठे हाल झाले. साधारण आठच्या सुमारास पावसाने उघडीप दिली. दरम्यान पारनेरात दुपारी पाऊस कोसळला.
नगर शहरात आणि परिसरात शुक्रवारी सायंकाळी अचानक आभाळ भरून येत बेमोसमी पावसाला सुरूवात झाली. यावेळी ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट देखील नगरकरांनी अनुभवला. या पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा यासह चारा पिकांना फायदा होणार असून काढणीसाठी आलेल्या अथवा सोंगणी होवून शेतात पडलेल्या सोयाबीन पिकाचा पावसापासून बचाव करतांना शेतकऱ्यांची एकच तारंबळ उडाली. काही वर्षापूर्वी जिल्ह्यात आशा प्रकारे ऐन दिवाळीत जोरदार पाऊस झाला होता. त्यावेळी दिवाळी चार ते पाच दिवस पाऊस बसत होता. जिल्ह्यात यंदा कमी पाऊस झालेला आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील ९६ महसूल मंडळात दुष्काळ सदृष्य स्थिती जाहिर करण्यात आलेली आहे. त्यातच अचानक बेमोसमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह व्यवसायिक, व्यापारी, फटका विक्रेते, पुजा साहित्य विक्रेते, दिवाळीतील विजेचे साहित्य विक्रेते यांची चांगलीच तारंबळ उडाली होती.
अकोले (प्रतिनिधी) -
वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाने आज दुपारी तालुक्यात सुमारे दोन तास जोरदार हजेरी लावली.या अवकाळी पावसाने आदिवासी भागात भात पिकांचे मोठे नुकसान झाले.अकोले शहर व परिसरात असणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या झोपड्यांसह काही तळ मजल्यातील गाळ्यांमध्ये पाणी शिरल्याने त्यांची मोठी तारांबळ उडाली. ऊस तोडणी मजुरांच्या झोपड्या असणाऱ्या शेतात आजू बाजूला पाणीच पाणी झाल्याने त्यांचे मोठे हाल झाले आहे. व्यापाऱ्यांची गाळ्यात शिरलेले पाणी बाहेर काढण्यासाठी त्रेधा तिरपीट उडाल्याचे चित्र दिसले.
रतनवाडीत २ इंच पाऊस
भंडारदरा (वार्ताहर)-ऐन हिवाळ्यात गत दोन दिवसांपासून भंडारदरा पाणलोटात पाऊस सुरू आहे. रतनवाडीत गुरूवारी झालेल्या पावसाची नोंद ४९ मिमी झाली आहे. भंडारदरात ७, घाटघर, पांजरे २, वाकीत ३ मिमी पावसाची नोंद झाली. काल शुक्रवारी दुपारी २ ते २.१५ वाजेपर्यंत पाऊस झाला. त्यामुळे बाजारकरूंची तारांबळ उडाली. भंडारदरात सध्या १०२६४ दलघफू पाणीसाठा आहे.
राहुरीच्या पूर्वभागातही हजेरी
राहुरी शहर व तालुक्याच्या पूर्वभागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. अन्य भागात ढगाळ हवामान होते.