रेल्वे स्टेशनवर वंचितांची दिवाळी झाली गोड

तुकाराम कातोरे शिक्षक मित्रमंडळाचा अनोखा उपक्रम
रेल्वे स्टेशनवर वंचितांची दिवाळी झाली गोड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दिवाळी सणानिमित्त नवे कपडे ,फटाके, गोड-धोड खाण्यात सर्व मशगुल झाले असताना फूटपाथवर रस्त्याच्या कडेला बसलेले अनाथ, निराधार, दिव्यांग, बहुविकलांग ,दुबळे तर कोणी पोटाशी पाय धरून तर कोणी डोक्याखाली हात घालून पहुडलेले अशा वेळी अचानक आवाज कानात ऐकू येतो आई, बाबा, उठा ...आज दिवाळी आहे. अभ्यंग स्नानाची वेळ झाली आहे आंघोळ करून घ्या, नवीन कपडे घाला, मिठाई खा तोंड गोड करा असे अनोखी पण तितकेच प्रेमळ शब्द कानावर ऐकू आल्यानंतर रस्त्यावर व रस्त्याच्या कडेला झोपलेले सर्व जीव पटापट उठत होते.

गुरूवारी दिवाळी आहे याची त्यांना जाणीव होत होती. मळकट कपडे डोक्याचे वाढलेले केस वाढलेली दाढी अशा रेल्वे स्टेशनवर कायम वास्तव्यास असलेल्या सुमारे 72 जणांना तुकाराम कातोरे व त्यांच्या सोबत ग्रंथालय चळवळीचे सुखदेव वेताळ, सुखदेव ढवळे राजेंद्र पोटे, जयसिंग भोर उद्योजक अजित पवार, शीला विजय गुगळे, हेमंत आभाळे, अंबादास रोहकले, सावता परिषद अध्यक्ष गणेश बनकर, रघुनाथ वेताळ, अवधूत पवार इत्यादी कार्यकर्त्यांनी भल्या पहाटे रेल्वे स्टेशनवर तसेच नगरच्या उपनगरात राहणार्‍या विकलांग व बहुविकलांग व रस्त्याच्याकडेला झोपलेल्या निराधार लोकांना दिवाळीची आठवण करून दिली.

सर्वांना रेल्वे स्टेशन परिसरात एकत्र केले त्यांना गरम पाण्याने व सुवासिक साबण लावून आंघोळी घातल्या त्यांचे वाढलेले केस कमी केले सर्वांना नवीन कपडे मिठाईचे बॉक्स दिले. त्यामुळे सर्वांचेच चेहरे आनंदाने उजळून निघाले सर्वांना दिवाळी आहे याची जाणीव झाली. 15 वर्षांपासून कातोरे व त्यांचा शिक्षक मित्रपरिवार न चुकता ही दिवाळी साजरी करत असतात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

आज समाजात सर्वत्र असंख्य अनाथ, निराधार व दिव्यांग लोक आहेत त्यांना आपले समजून आपल्या ताटातील एक घास भरविला पाहिजे व त्यांना दिवाळीच्या सणाचाआनंद दिला पाहिजे.

- तुकाराम कातोरे, सरपंच कामरगाव

मला घरदार व नातेवाईक नाहीत मी एकटीच राहते. आज मला दिवाळी निमित्त रेल्वे स्टेशनवर आई, वडील व भाऊ भेटल्याचे समाधान वाटले.

- पुष्पा भोसले, नांदेड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com