रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे 85 हजाराचा मोबाईल साईभक्तांला सुपूर्द - पो. नि. पारखे

रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे 85 हजाराचा मोबाईल साईभक्तांला सुपूर्द - पो. नि. पारखे

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असलेल्या शिर्डी येथील रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुमारे 85 हजार रुपये किंमतीाचा मोबाईल साईभक्तांला सुपूर्द केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण पारखे दिली.

साई दर्शनासाठी भारत गौरव रेल्वेने दि. 16 जून रोजी सकाळी 6 वाजता साईबाबांच्या दर्शनासाठी सपत्नीक आलेल्या साईभक्तांचा 85 हजार रुपये किंमतीचा मोबाईल रेल्वेमध्ये अनावधानाने विसरून राहिला होता. शिर्डीत रेल्वे आल्यानंतर हे कुटुंब साई दर्शनासाठी निघून गेले होते. या काळात साईनगर रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून रेल्वेची तपासणी करत असताना रेल्वे पोलिस पथकाला 85 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल मिळून आला होता.

तांत्रिक पद्धतीने मुळ मालकांचा शोध घेऊन व त्यावर आलेल्या मोबाईलच्या माध्यमातून या मालकांचा शोध सुरू असताना सदरचा मोबाईल हा साईभक्त वाय. नटराजन (वय 38) पुन्नमापेठ, तामिळनाडू यांच्या पत्नीचा असल्याचे लक्षात येताच या दोन्ही साईभक्तांना फोन करून तुमचा मोबाईल मिळून आलेला असून तो घेण्यासाठी आपण साईनगर रेल्वे स्थानकात हजर राहावे, असे सुचित केले.

त्यानंतर तात्काळ साईभक्त वाय. नटराजन यांनी त्यांचा असलेला मोबाईल ओळखला त्यानंतर पंचासह पंचनामा करून महागड्या किमतीचा मोबाईल श्री. नटराजन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, आपला हरवलेला मोबाईल आता आपल्याला मिळणार नाही अशी खात्री असताना आपल्याला मिळालेला मोबाईल साईबाबांची एक प्रकारे कृपाच असल्याचे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.

साईनगर रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून या प्रकारची गुन्हेगारी कृत्य करू नये अथवा गुन्हा होणार नाही यासाठी मोठ्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगून शिर्डीत येणार्‍या साईभक्तांना साईनगर रेल्वे स्थानकाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची सेवा कशी देता येईल यासाठी आमचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न असल्याचे रेल्वे अधिकारी प्रवीण पारखे यांनी सांगितले. यावेळी डी. बी. कचरे, सचिन आव्हाड, सुभाष मिसाळ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com