पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू; गुन्हा ‘सीआयडी’कडे वर्ग

तपासासाठी पोलीस उपअधीक्षक पवार यांची नियुक्ती
पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू; गुन्हा ‘सीआयडी’कडे वर्ग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लोहमार्ग पोलिसांच्या मारहाणीत तक्षलणाचा मृत्यू झाल्याच्या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे. या गुन्ह्याचे तपासी अधिकारी म्हणून विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस महासंचालकांनी हे आदेश दिले आहेत.

4 ऑगस्टला विशाल धेंडे (वय 35, रा. केडगाव) या तरुणाचा मृतदेह रेल्वे स्थानकातील रूळाच्या बाजूला आढळला होता. धेंडे याचा मित्र शरद गुलाब पवार (रा. गाडीतळ, अमरधामजवळ, रेल्वे स्टेशन रस्ता) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोहमार्ग पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सचिन वाकसे, करण (पूर्ण नाव नाही), एक पोलीस (नाव नाही) व एक अनोळखी अशा चौघांविरूध्द मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला.

रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गेल्या पाच दिवसांत लोहमार्ग पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही. सर्वसाधारणपणे पोलीस कोठडीत किंवा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या, अटकेत असलेल्या आरोपीचा मृत्यू झाल्यानंतर गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याची प्रथा अवलंबली जाते. मात्र, या घटनेत धेंडे याला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली नव्हती किंवा अधिकृतरित्या ताब्यात घेतले नव्हते, तरीही अनधिकृतपणे लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात असताना धेंडे यांचा मृत्यू झाला तसेच पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप असल्याने या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान गुन्ह्यातील संशयित आरोपी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com