उपाशी ठेवण्याचे कारस्थान; हमाल-मापाडी संघटनेचा आरोप

धक्क्यावरील माल बाहेरगावी अनलोड
उपाशी ठेवण्याचे कारस्थान; हमाल-मापाडी संघटनेचा आरोप

अहमदनगर | प्रतिनिधी

हुंडेकरी व माल वाहतूकदार हे खत कंपन्या अधिकारी, सरकारी कृषी अधिकार्‍यांच्या संगनमताने अहमदनगर रेल्वे (Ahmednagar Railway) मालधक्क्यावर येणारा माल बाहेरगावीच उतरवून घेत आहेत. करोना संकटकाळात काम इतरत्र वळवून बेरोजगारीची आपत्ती निर्माण केली जात आहे. येथील कष्टकरी हमाल माथाडी कामगारांना व कुटुंबियांना उपाशी ठेवण्याचे कारस्थान सुरू आहे, असा आरोप सिटू संलग्न रेल्वे माथाडी व काँट्रॅक्ट लेबर युनियनने (Railway Mathadi and Contract Labor Union) केला आहे.

रेल्वे मालधक्क्यावर हमाल माथाडी कामगारांना काम देण्यात यावे या मागणीसाठी सिटू संलग्न रेल्वे माथाडी व कॉन्ट्रॅक्ट लेबर युनियनच्यावतीने हमाल माथाडी कामगारांची बैठक झाली. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून भर संकटकाळात याच हमाल माथाडी कामगारांनी आपल्या

जीवाची, कुटुंबाची पर्वा न करता शेतीसाठी लागणारी खते, जनतेला लागणारे अन्नधान्य तसेच सिमेंट आदी माल उतरवला. जिल्ह्याची संकटकाळाची गरज भागवली. वाढत्या महागाईनुसार त्यांच्या हक्काची त्रैवार्षिक दरवाढ करणे गरजेचे असताना आता त्यांची अडवणूक केली जात आहे.

हुंडेकरी व माल वाहतुकदार हे खत कंपन्या अधिकारी, सरकारी कृषी अधिकार्‍यांच्या संगनमताने अहमदनगर रेल्वे मालधक्क्यावर येणारा माल बाहेरगावीच उतरवून घेत आहेत. कोरोना संकटकाळात त्यांचे काम इतरत्र वळवून आणखी एक बेरोजगारीची आपत्ती निर्माण केली जात आहे. येथील कष्टकरी हमाल माथाडी कामगारांना व कुटुंबियांना उपाशी ठेवण्याचे कारस्थान सुरू आहे. येथील हमाल माथाडी कामगार कष्टाचे पैसे मागत असताना त्याला ते दिले जात नाहीत. त्यांना कामापासून वंचित ठेवले जात आहे. भर कोरोना संकटकाळात शहर व जिल्ह्याला याच हमाल माथाडी कामगारांनी काम करत खते, अन्नधान्याचा पुरवठा केला आहे. हे लक्षात घेतले पाहिजे.

येथे शहर आणि परिसरातील सुमारे सहाशे नोंदणीकृत कामगार काम करतात. त्यांच्यावर अवलंबुन असणारे त्यांचे लेकरंबाळं आणि कुटुंबिय असे 3 हजारापेक्षा जास्त लोकांवर यामुळे आपत्ती कोसळली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य, खते, सिमेंट व इतर माल येत असतो. दर तीन वर्षांनी वेतनवाढ विषयक करार होत असतो. परंतु गेल्या वर्षीच्या कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे केवळ एक वर्षाचाच करार झाला. हा करार 31 मार्च 2021 रोजी संपुष्टात आला. या नंतर मालधक्क्यावरील माथाडी कामगार आणि हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार यांच्यामध्ये अनेकदा बोलणी झाली, पण करार होऊ शकला नाही. सरतेशेवटी सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष, माथाडी कामगार मंडळ, अहमदनगर यांनी इतर जिल्ह्यातील रेल्वे मालधक्यावरील प्रचलित दरांचा सांगोपांग विचार करून कामकाज सुरळीत होण्यासाठी 28 जुलै 2021 रोजी मजुरी व वाराईचे दर निश्‍चित करून काम सुरू करण्याचे आदेश दिले.

माथाडी कामगारांनी प्रस्तुत आदेश मान्य असल्याचे आणि काम करण्यास तयार असल्याचे लेखी स्वरूपात कळविले. पण हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार यांनी आडमुठेपणाची भूमिका घेऊन अहमदनगर रेल्वे मालधक्क्यावर येणारा माल जाणीवपूर्वक इतरत्र स्थलांतरीत केला. या संदर्भात सहायक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष, माथाडी कामगार मंडळ, अहमदनगर यांनी वारंवार आदेश देऊनही हुंडेकरी व वाहतूक ठेकेदार हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहेत.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी सोलापुर येथील रेल्वे माथाडी व काँट्रॅक्ट लेबर युनियनचे नेते कॉम्रेड रमेशबाबू होते. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष कॉम्रेड महेबूब सय्यद, कामगार संघटना महासंघाचे कॉम्रेड भैरवनाथ वाकळे, क्रांतिसिंह कामगार संघटनेचे कॉम्रेड रामदास वागस्कर, एम. एस. एम. आर. ए. चे कॉम्रेड राजू कांबळे आदी उपस्थित होते, अशी माहिती अहमदनगर मालधक्यावरील रेल्वे माथाडी व कॉन्ट्रॅक्ट लेबर युनियनचे स्थानिक निमंत्रक नगरसेवक प्रशांत गायकवाड, विलास उबाळे आणि गणेश कंटूर यांनी दिली.

या प्रसंगी सुरेश निरभुवणे, संजय पाडळे, शरद वाकचौरे, गणेश जाधव, संभाजी कोतकर, पोपट लोंढे, सागर पोळ, मधुकर पाटोळे, दीपक रोकडे, दत्तात्रय अनावणे, विलास गुंड, भगवान शेंडे, बळीराम शेंडे, वसंत पेटारे, रोहिदास भालेराव, अशोक चिलगर आदी उपस्थित होते.

बेमुदत उपोषण

प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी रेल्वे माथाडी व काँट्रॅक्ट लेबर युनियन 7 सप्टेंबर 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण करणार आहेत. कामगारांनी कुटुंबियांसह मोर्चाने जावे, असा निर्णय माथाडी कामगारांच्या बैठकीत घेण्यात आला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com