रेल्वे दुहेरीकरणासाठी प्रमाणापेक्षा जास्त मुरूम वाहतूक
सार्वमत

रेल्वे दुहेरीकरणासाठी प्रमाणापेक्षा जास्त मुरूम वाहतूक

पढेगाव-कारेगाव रस्त्याची दयनीय अवस्था

Arvind Arkhade

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामासाठी गावतळ्यातून मुरूम वाहतूक सुरू आहे. मालवाहू मोटारीत क्षमतेपेक्षा जास्त मुरूम नेला जात असल्याने कारेगाव रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे संतप्त गावकर्‍यांनी रास्तारोको आंदोलन केले. आश्वासनानंतर ते मागे घेण्यात आले.

नगर- मनमाड रेल्वे मार्गाचे दुरुस्तीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्याकरिता सध्या पढेगाव परिसरात भराव टाकण्याचे काम सुरू आहे. या भरावाकरिता कारेगाव शिवारातील टिळेकरवस्ती येथील गावतळ्यातून मुरूम आणला जात आहे. मुरूमाची वाहतूक पढेगाव ते कारेगाव रस्त्याने केली जाते.

क्षमतेपेक्षा जास्त मुरूम मालवाहू मोटारीतून नेला जातो. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात अनेक लोक पडले आहेत. रस्ता वाहतुकीच्या लायक राहिलेला नाही. त्यामुळे पढेगाव येथील गावकर्‍यांनी रास्तारोको आंदोलन केले.

गावकर्‍यांनी यापूर्वी केलेल्या तक्रारीमुळे तहसीलदार प्रशांत पाटील यांनी रस्त्याची पाहणी केली होती. त्यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना अहवाल पाठविला आहे. तसेच ठेकेदाराला क्षमतेपेक्षा जास्त मुरूम वाहतूक केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला.

आंदोलनाची दखल घेऊन महसूल व बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी गावकर्‍यांची भेट घेतली. या रस्त्याच्या दुरुस्तीचा अहवाल जिल्हाधिकारी द्विवेदी यांना पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच सध्या रस्त्याची देखभाल ठेकेदार यांनी करावी, असे संबंधितांना लेखी पत्र दिले.

आंदोलनात शरद बनकर, भास्कर लिप्टे, राजेंद्र तोरणे, उपसभापती बाळासाहेब तोरणे, रामभाऊ लिप्टे, नितीन बनकर, प्रदीप आहेर, प्रशांत लिपटे, देविदास चणघटे, सचिन लिपटे, उदय लिपटे, आदिनाथ काळे, आनंद बनकर, गोरख निसरगड, अनिल पवार, दत्तात्रय लिप्टे, प्रशांत बनकर, सचिन बनकर, राजू लिप्टे, महेश ढोरस्कर आदी सहभागी झाले होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com