रेल्वेने हद्द निश्चितीसाठी पोल लावल्यामुळे ग्रामस्थांत खळबळ

रेल्वेने हद्द निश्चितीसाठी पोल लावल्यामुळे ग्रामस्थांत खळबळ

पुणतांबा |वार्ताहर|Puntamba

रेल्वे खात्याने पुणतांबा-चांगदेवनगर-जळगाव या रोडलगतच रेल्वेच्या हद्दीच्या खुणा निश्चित करून त्या ठिकाणी सिमेंट पोल उभे केल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

सध्या दौंड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे मूळ रेल्वे मार्गाच्या पूर्व बाजूने काम सुरू आहे. त्यामुळे रेल्वे खात्यामार्फत पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूच्या हद्दी निश्चित केल्या आहेत. पूर्व बाजूच्या हद्दीत आता काही शेतकर्‍यांच्या जमिनीत पोल उभे केले आहेत तर पश्चिम बाजूला रस्त्यालगत पोल आहेत. दोन्ही बाजूचे अंतर विचारात घेता अंदाजे 150 फूट हद्द रेल्वेने निश्चित केली असावी, असे प्रतिपादन चांगदेवनगर येथील शेतकरी दादासाहेब सांबारे यांनी केले.

पंतप्रधान सडक योजने अंतर्गत तयार करण्यात आलेल्या पुणतांबा-जळगाव या रस्त्यालगतच रेल्वेची हद्द निश्चित केल्यामुळे भविष्यात या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या वेळी अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच रेल्वेची ती अंतिम हद्द असेल तर रेल्वे स्टेशन रोडवर लगत काही व्यापार्‍यांचे पुर्नवसन करण्याची गरज निर्माण होऊ शकते. तसेच रेल्वेच्या हद्दीत सामाजिक वनीकरण विभागामार्फत तीन वर्षापूूर्वी दोन हजारपेक्षा जास्त वृक्षाचे वनीकरण केले असून त्या वृक्षाचे भवितव्य सुद्धा नेमके काय राहील याबाबत सांशकता व्यक्त केली जात आहे. कारण आता झाडे मोठी झाली आहेत तसेच चांगदेवनगर येथील भुयारी पुलाचे काम सुरू झाल्यावर रेल्वेने त्यांच्या हद्दीत खोदलेला मुरूम टाकल्यामुळे अनेक झाडांचे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

रेल्वेचे जनरल मॅनेजर येत्या 15 डिसेंबर रोजी पुणतांबा रेल्वे स्थानकाला भेट देणार असल्यामुळे रेल्वे स्थानक चकाचक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यात रंगरंगोटी, परिसर स्वच्छ करणे, रेल्वेच्या कार्यालयाची दुरुस्ती व सुशोभीकरण करणे, प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा उपलबध करून देणे ही कामे वेगाने सुरू आहेत. त्यामुळे पुणतांबा जंक्शन रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहराच बदलत आहे. रेल्वेने हद्द निश्चितीसाठी लावलेले पोल तसेच पुणतांबा रेल्वे स्थानकावर तातडीने आरक्षण सेवा सुरू कराव्यात बहुतांशी गाड्यांना थांबा मिळावा यासह अनेक प्रश्नांकडे जनरल मॅनेजर यांचे लक्ष वेधण्यासाठी चांगदेवनगर येथील ग्रामस्थांचे एक शिष्टमंडळ त्यांची परवानगी घेऊन भेट घेणार असल्याचे दादासाहेब सांबारे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com