ब्राम्हणी-देवळाली प्रवरात दारू-मटका, जुगार अड्ड्यांवर छापे

नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची कारवाई ; देवळालीत दोनजण गजाआड
ब्राम्हणी-देवळाली प्रवरात दारू-मटका, जुगार अड्ड्यांवर छापे

राहुरी (प्रतिनिधी) - राहुरी तालुक्यात राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत. दि. 19 जून रोजी अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दोन ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर छापा टाकला. मुद्देमालासह दोन जणांना ताब्यात घेतले.

पहिली कारवाई ही 19 जून रोजी दुपारी दीड वाजे दरम्यान देवळाली प्रवरा येथील बाजार तळावर केली. याठिकाणी आरोपी राजू जबाजी पंडित (वय 45 वर्षे, रा. देवळाली प्रवरा) हा कल्याण मटका नावाचा हार जितीचा जुगार लोकांकडून पैसे घेऊन लोकांना चिठ्ठ्या देऊन खेळताना व खेळविताना मिळून आला. यावेळी त्याच्याकडून मटका खेळण्याचे साहित्य व 1 हजार 512 रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेत राहुरी पोलिसांत आरोपी राजू जबाजी पंडित याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी कारवाई ही 19 जून रोजी दुपारी दोन वाजे दरम्यान बाजारतळावरील एका टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर करण्यात आली. यावेळी आरोपी शकील गुलाब शेख (रा. देवळाली प्रवरा) हा मटका चालविताना आढळून आला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने हातातील कागद खाली टाकून तो पसार झाला. यावेळी त्या ठिकाणाहून मटका खेळण्याचे साहित्य व 490 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. तसेच आरोपी शकील गुलाब शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनेत स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार शिवाजी अशोक ढाकणे यांनी फिर्याद दिली. दोन्ही घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार टिक्कल करीत आहेत.

दरम्यान, राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे दोन ठिकाणच्या दारूअड्ड्यांवर अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने छापा मारून 1 हजार 800 रुपयांचा देशी व विदेशी दारूचा साठा जप्त करून दोघांविरोधात राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिला छापा दि. 19 जून रोजी सकाळी साडेअकरा वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील केंदळ रोड लगत असलेल्या सागर पान स्टॉलच्या आडोशाला असलेल्या दारूअड्ड्यावर टाकला. त्या ठिकाणाहून 1 हजार 80 रुपयांच्या देशी व विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच आरोपी सागर साहेबराव ठुबे (वय 27 वर्षे, रा. ब्राम्हणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक वाल्मिक पारधी करीत आहेत.

दुसरा छापा त्याच दिवशी त्याच परिसरात दुपारी साडे बारा वाजे दरम्यान त्रिमूर्ती कलेक्शनच्या मागे असलेल्या दारूअड्ड्यावर टाकला. त्या ठिकाणाहून 720 रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. आरोपी कारभारी गोपीनाथ साठे (वय 51 वर्षे, रा. ब्राम्हणी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक पालवे करीत आहेत. दोन्ही घटनेत स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक रोहित अंबादास येमुल यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही घटनेतील आरोपी हे स्वतःच्या फायद्याकरिता विनापरवाना दारू विक्री करताना आढळून आले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com