
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी शहर हद्दीतील विजय बोबडे या 26 वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत शहरात वेगवेगळ्या प्रकारची चर्चा सुरू आहे. मात्र पोलीस ठाण्यात सध्या आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
विजय सुभाष बोबडे हा तरुण राहुरी शहरातील भुजाडी इस्टेट परिसरातील मुक्तांगण शाळेजवळ त्याच्या आई-वडिलांसह राहत होता. दि. 13 डिसेंबर रोजी सकाळी तो घरातून बाहेर पडला होता. दिवसभर काही मित्रांना भेटून त्याने गप्पा मारल्या. काल दि. 14 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजे दरम्यान राहुरी शहर हद्दीतील नावघाट परिसरात असलेल्या स्मशानभूमी जवळील काटवनात एका बाभळीच्या झाडाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत विजय बोबडे याचा मृतदेह दिसून आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक चारूदत्त खोंडे, पोलीस नाईक शिवाजी खरात, नदीम शेख, दिगंबर सोनटक्के यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी काही तरुणांच्या मदतीने विजय बोबडे याला खाली उतरविण्यात आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. विजय बोबडे याच्या डाव्या हाताच्या मनगटावर ब्लेड सारख्या हत्याराने वार केल्याचे दिसत होते. त्यामुळे विजय बोबडे याने आत्महत्या केली की, त्याचा घातपात झाला? अशी शहरात चर्चा सुरू आहे. मात्र या घटनेबाबत सध्यातरी आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.