
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
इंस्टाग्रामवर एका समाजाच्या भावना दुखावल्याचा मेसेज टाकल्याच्या संशयावरून एका तरुणाला व त्याच्या आईला घरातून बाहेर ओढून दहा ते बारा तरुणांच्या टोळक्याने फायटरने मारहाण केल्याची घटना राहुरी शहरातील सोनार गल्ली परिसरात घडली. या घटनेनंतर काही काळ राहुरी ठाण्यासमोर तरुणांनी गर्दी केल्याने मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शहरातील सोनार गल्ली परिसरात एका तरुणाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केल्याच्या संशयाच्या कारणातून दहा ते बारा जणांच्या टोळक्याने त्या तरुणाच्या घरी येऊन त्याला बाहेर बोलावून जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. या मुलाला सोडविण्यासाठी त्याच्या आईने मध्यस्ती केली असता त्या महिलेलाही मारहाण करण्यात आली.
तरुणाला मारहाण झाल्याचे कळताच शहरातील काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत राहुरी पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तरुणाच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी अलफाज शेख याच्यासह अन्य 10 ते 15 जणांवर भारतीय दंड विधान कलम 452, 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. बाकीच्या आरोपींचा पोलीस शोध घेत असल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून समजते. पुढील तपास उपनिरीक्षक निरज बोकील करत आहेत.
मारहाणीची फिर्याद देण्यासाठी आलेल्यांना एका पोलीस अधिकार्याने अपशब्द वापरल्याने पोलीस ठाण्याच्या आवारात काही काळ चांगलाच तणाव निर्माण झाला होता. याबाबत काही संघटना या अधिकार्याच्या विरोधात जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार करणार असल्याचे समजते.