राहुरीच्या पूर्वभागाची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

चौदा गावच्या योजनेची नदीपात्रातील जलवाहिनी वाहून गेल्याने
राहुरीच्या पूर्वभागाची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती

कोंढवड |वार्ताहर| Kondhwad

धो-धो कोसळणारा पाऊस व मुळानदी दुथडी वाहत असताना बारागाव नांदूर व 14 गाव पाणी योजनेची मुख्य जलवाहिनी मुळानदी पात्रात वाहून गेल्याने गेल्या दहा दिवसांपासून नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

राहुरी तालुक्यातील मुळानदी काठच्या बारागाव नांदूर, डिग्रस, राहुरी खुर्द, तमनर आखाडा, देसवंडी, तांदूळवाडी, कोंढवड, शिलेगाव, आरडगाव, मानोरी, वळण, केंदळ बु., केंदळ खुर्द, वळणपिंप्री, चंडकापूर, मांजरी गावांना पिण्याच्या पाण्यासाठी बारागाव नांदूर व 14 गाव ही योजना कार्यान्वित आहे. मात्र, मागील आठवड्यात राहुरी खुर्द येथील मुळानदी पात्रात या योजनेची मुख्य जलवाहिनी फुटली होती. त्यानंतर दोनच दिवसांत या मुख्य जलवाहिनीची दुरूस्तीही केली.

परंतु, त्याठिकाणी ही वाहिनी पुन्हा फुटल्याने नदीकाठच्या कोकाटे नामक शेतकर्‍याचेही मोठे नुकसान झाले आहे. योजनेच्या देखभाल समितीच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकर्‍याच्या वाहून गेलेल्या शेतात बाहेरून आणून भरसुद्धा टाकली होती. मात्र, शुक्रवार दि. 16 सप्टेंबरच्या रात्री मुळा धरणातून नदीपात्रात जवळपास 20 हजार क्युसेकने पाणी सोडल्याने दुरूस्त केलेली अंदाजे 60 फूट वाहिनीचे पाईप वाहून गेले.

मुळानदी काठच्या गावांना खार्‍यापाण्याचा पट्टा म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काहींनी आपल्या घराच्या छताचे पावसाचे पाणी साठवून ते पाणी पिण्यासाठी वापरत आहेत. तर काही नागरिक थेट राहुरीहून मोटारसायकल अथवा इतर साधनाने पाणी आणत आहेत.

आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असून नागरिकांना घराच्या बाहेर पडणे शक्य नाही. तसेच जनावरांनाही पिण्यासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. नदीचे पाणी व पाऊस कमी झाल्यानंतर या योजनेच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे योजनेच्या देखभाल समितीकडून समजते. तोपर्यंत ओला दुष्काळासारखी परिस्थिती असूनही पिण्यासाठी पाणी मिळणे अवघड बनले आहे.

आजच्या बैठकीकडे लक्ष

बारागाव नांदूर व 14 गाव पाणीपुरवठा देखभाल समितीची मुख्य जलवाहिनी नदीपात्रात वाहून गेल्याने या वाहिनीची दुरूस्ती व या गावांना टँकरने पाणीपुरवठा करणे याविषयी चर्चा करण्यासाठी आज सकाळी 10 वाजता माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी नगरपरिषदेत या गावांच्या सरपंच, सदस्य व ग्रामस्थांची बैठक बोलावली असून या बैठकीत काय निर्णय होतो? याकडे मुळानदी काठच्या गावांचे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com