
उंबरे (वार्ताहर)
राहुरी तालुक्यात मोफत धान्य वितरण योजनेंतर्गत मिळणाऱ्या फेब्रुवारी महिन्यातील साठा मे महिन्यात प्राप्त झाला. मे महिन्यातील २० दिवसही उलटून गेले. मात्र, तालुक्यातील १०८ धान्य दुकानांना हे धान्य वितरित करण्यासाठी उपलब्ध असूनही मात्र, पॉश मशिनमध्ये डाटाच उपलब्ध नसल्याने राहुरी प्रशासनाची पुरती पंचाईत झाली आहे. डाटाच नसल्याने हे धान्य वितरण करायचे कसे? असा मोठा पेचप्रसंग प्रशासनासमोर उभा राहिला आहे.
दरम्यान, बऱ्याच दिवसांपासून हे धान्य दुकानातच पडून राहिल्याने व त्यातच आता पावसाळी हंगाम तोंडावर आल्याने हे धान्य खराब होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा तिढा सुटण्यासाठी राहुरी प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला साकडे घातले आहे. फेब्रुवारीचेच धान्य अद्यापही वितरित न झाल्याने लाभार्थी नागरिकांचे लक्ष या मोफत धान्याकडे लागले आहे. धान्य मिळत नसल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली. मात्र, याबाबत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी त्याकडे लक्ष दिले नाही. पर्यायाने हे धान्य मिळणार की नाही ? याबाबत नागरिक संभ्रमात सापडले आहेत. फेब्रुवारीसाठी गहू ६ हजार ७८२ क्विंटल तर तांदूळ ४ हजार ५०३ क्विंटल असा साठा १०८ धान्य दुकानांना वितरित करण्यात आला आहे.
केंद्र शासनाने मोफत धान्याचा फेब्रुवारी महिन्याचा साठा तब्बल तीन महिने उशिरा पाठविला. त्यातच वितरणाचा डाटाही उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक गोरगरीब लाभार्थी या मोफत धान्य दुकानाकडे चकरा मारून विचारणा करतात. दुकानात धान्य असूनही ते वाटप का होत नाही? याबाबत अनेकदा लाभार्थी नागरिकांचे दुकानचालकांबरोबर वादही होत आहेत. मात्र, दुकानदार डाटा उपलब्ध नसल्याची माहिती देतात. ही माहिती खरी की खोटी? ही खातरजमा करण्यासाठी लाभार्थी थेट राहुरी पुरवठा विभागाच्या अधिकारी नायब तहसीलदार पुनम दंडीले यांच्याकडे याविषयी विचारणा करतात. तरीही लाभार्थ्याचे समाधान होत नाही. आतापर्यंत केंद्र शासनाने मोफत धान्य वाटप केले. त्यावेळी धान्य दुकानदारांनी केंद्र शासनाचा डाटा उपलब्ध नसल्याची सबब सांगितली नव्हती. परंतु या साठ्यालाच ही सबब सांगितल्याने लाभार्थ्यांचा आता विश्वास बसायला तयार नाही. या धान्याचे वाटप झाले नाही तर पुन्हा हे धान्य परत जाते की काय ? अशी चिंता लाभार्थ्यांना पडली आहे.
संगणकप्रणाली धान्य वितरणात आल्याने आणखी गोंधळ वाढला आहे. मुळा तच डाटा म्हणजे काय ? अशी माहिती दस्तुरखुद्द दुकानदार व सर्वसामान्य लाभार्थी नागरिकांनाही माहिती नाही. केवळ अंगठा देऊन धान्य घ्यायचे, अशी सोप्पी पद्धत नागरिकांनी आत्मसात केली आहे. त्यामुळे आता डाटानेच घोळ घातल्याने ही संगणकप्रणाली धान्य वितरणात मोठी अडसर ठरली आहे.
माहे फेब्रुवारी महिन्यातील धान्य वितरण ई-पॉस मशिनला डेटा नसल्याने त्याचे लाभार्थ्याना वाटप करता येत नाही. त्यामुळे हे धान्य दुकानदारांकडेच पडून आहे. तर फेब्रुवारी महिन्याच्या धान्य वितरणासाठी मुदतवाढ मागितली आहे. मात्र, मुदतवाढ मिळालेली नाही. त्यामुळे आता हे धान्य मोफत वाटपास जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे परवानगी मागितली आहे.
- फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी, ..