राहुरी तालुक्यातील 11 गावांना होणार पूर्णदाबाने वीज पुरवठा
सार्वमत

राहुरी तालुक्यातील 11 गावांना होणार पूर्णदाबाने वीज पुरवठा

ना. प्राजक्त तनपुरे : अतिरिक्त क्षमतेच्या ट्रान्सफार्मर बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन

Arvind Arkhade

राहुरी |तालुका प्रतिनिधी|Rahuri

राहुरी शहरालगतच्या काही गावांना त्यात मोमीन आखाडा, मल्हारवाडी, गडदे आखाडा, राहुरी खुर्द, बारागाव नांदूर, पिंपरी अवघड, उंबरे, देसवंडी, कोंढवड, शिलेगाव, तांदूळवाडीला पूर्णदाबाने उच्च दर्जाचा चांगल्या प्रतीचा वीजपुरवठा होण्यासाठी राहुरी खुर्द येथील 33 केव्ही उपकेंद्र येथे नव्याने बसविण्यात येणार्‍या पॉवर ट्रान्सफार्मर उपलब्ध होणार असून या भागातील शेतकर्‍यांची मागणी पूर्ण होणार आहे. इतर भागासाठीही आपण प्रयत्नशील असल्याचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

ना. प्राजक्त तनपुरे यांच्याहस्ते काल राहुरी खुर्द येथील 33/11 केव्ही उपकेंद्रात अतिरिक्त क्षमतेचा पॉवर ट्रान्सफार्मर बसविण्यात येणार असून त्या कामाचा भूमिपूजन सोहळा मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी नाशिक परिमंडलचे मुख्य अभियंता संजय खंदारे, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, कार्यकारी अभियंता शरद बंड, राहुरी विभागाचे उपअभियंता धीरज गायकवाड, आदींसह लाभार्थी गावाचे सरपंच उपस्थित होते.

ना. तनपुरे म्हणाले, कृषी विद्यापीठ येथे महावितरणच्या सर्व अधिकार्‍यांची बैठक घेऊन चर्चा केली. तेव्हा शेतकर्‍यांना पूर्ण क्षमतेने नियमित वीजपुरवठा कसा करता येईल? याबाबत चर्चा केली. केंद्र सरकारच्या एकात्मिक ऊर्जा विकास योजनेतून राहुरी खुर्द येथील 33/11 केव्ही उपकेंद्रात एक नवीन ट्रान्सफार्मर प्रस्तावित करण्यात येऊन तिथे पॉवर ट्रान्सफार्मर बसवून त्यातून निघणार्‍या 3 फीडरमधून राहुरी शहराच्या आसपास असलेल्या गावांना पूर्ण क्षमतेने नियमित पूर्णवेळ वीजपुरवठा होणार आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्री सौर उर्जा योजनेचा आढावा घेतला असता तालुक्यातील आरडगाव, वांबोरी, ताहाराबाद येथील उपकेंद्राशेजारी जर 5 एकर शासनाची जमीन असेल तर त्या भागातील शेतकर्‍यांना दिवसा वीज देण्याचा या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न आहे.त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणचे प्रतिनिधी जागा पाहात असून त्यास लवकरात लवकर मान्यता घेऊन तिथे सौरउर्जा प्रकल्प उभा करण्याचा मानस आहे.

महावितरणचे मुख्य अभियंता खंदारे म्हणाले, राहुरी तालुक्यांतर्गत योजनेत 9 कोटींची नवीन विविध कामे मंजूर आहेत. त्यातील 5 कोटींची कामे पूर्ण झाली आहेत. आणखी 1.50 कोटींची कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. राहुरी शहरासाठी एकात्मिक उर्जा विकास योजनेतून राहुरी उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असून शहरातील ग्राहकांना पूर्ण दाबाने व अखंडीत वीजपुरवठा होत आहे. या कामास 1.50 कोटी रुपये खर्च आल्याचे खंदारे यांनी सांगितले.

सूत्रसंचालन राजेंद्र घाडगे यांनी केले. कार्यक्रमास बाळासाहेब पेरणे, प्रभाकर म्हसे, अय्यूब शेख, नंदू पेरणे, राहुल म्हसे, सरपंच रवींद्र म्हसे, संदीप पानसंबळ, संजय म्हसे, ऋषिकेश म्हसे, अंबादास म्हसे, लक्ष्मण म्हसे, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, भारत भुजाडी आदींसह गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com