राहुरी विद्यापीठात कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन सुरू

राहुरी विद्यापीठात कर्मचार्‍यांचे लेखणी बंद आंदोलन सुरू

राहुरी विद्यापीठ |वार्ताहर| Rahuri

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांनी दुसर्‍या टप्प्याचे आंदोलन सकाळी 11 वा सुरू केले.

यावेळी कर्मचार्‍यांनी सातवा वेतन आयोग आणि आश्वासित प्रगती योजना लागू होण्यासाठी जोरदार घोषणा दिल्या. या आंदोलनाचे आयोजन समन्वय संघाचे उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम, कार्याध्यक्ष डॉ. महाविरसिंह चौहान आणि सहसचिव डॉ. संजय कोळसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

डॉ. चौहान यांनी सांगितले, या आंदोलन टप्पा क्र. 2 नुसार दि. 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत कृषी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी काळ्या फिती लावून कार्यालयात उपस्थित राहून हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करून कुठल्याही प्रकारचे कार्यालयीन अथवा प्रक्षेत्रविषयक कामे न करता लेखणी बंद आंदोलन करणार आहेत. तसेच आंदोलन टप्पा क्र. 3 नुसार कृषी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व अधिकारी व कर्मचारी काळ्या फिती लावून दि. 6 नोव्हेंबर रोजी एक दिवस सामूहिक रजा देऊन आंदोलन करतील. कृषी सहाय्यक संघटनेचे अध्यक्ष पी.टी. कुसळकर यांनी 10/20/30 या तीन लाभांशासह आश्वासित प्रगती योजना लागू होणे आवश्यक असल्याचे सांगितले.

कृषी विद्यापीठातील अधिकारी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी आणि 10/20/30 वर्षानंतर अनुज्ञेय ठरणारी तीन लाभांच्या सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परिसरातील समन्वय संघाचे सर्व पदाधिकारी, सर्व अधिकारी व कर्मचारी, यांनी एकत्र येत प्रशासकीय इमारतीच्या बाहेर आंदोलनाच्या दुसर्‍या टप्प्यातील आंदोलन केले.

यावेळी उपस्थित सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले व विद्यापीठाच्या प्रशासनातील कार्यालय अधीक्षक सुहास हराळे यांना सातव्या वेतन आयोगाच्या मागणी संदर्भात निवेदन विद्यापीठ समन्वय संघाच्यावतीने देण्यात आले.

यावेळी समन्वय संघाचे गणेश मेहेत्रे, मच्छिंद्र बाचकर, डॉ. संजय कोळसे, महेश घाडगे, जनार्धन आव्हाड, मच्छिंद्र बेल्हेकर, संजय ठाणगे, एकनाथ बांगर व सौ. सुरेखा निमसे इ. पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनाप्रमाणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 10 जिल्ह्यांमधील संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये इ. ठिकाणी अशा प्रकारचे आंदोलन करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com