राहुरी तालुक्यात लसीकरणाचा फज्जा; आरोग्य व्यवस्था ‘सलाईन’वर

राहुरी तालुक्यात लसीकरणाचा फज्जा; आरोग्य व्यवस्था ‘सलाईन’वर

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात एकीकडे लॉकडाऊनचा फज्जा उडाल्यानंतर करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असताना दुसरीकडे तालुक्यातील लसीकरणही ठप्प झाले आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा कोमात गेली असून करोना मात्र, जोमात असल्याचे चित्र राहुरी तालुक्यात निर्माण झाले आहे. लसीकरणासाठी अनेक नागरिकांसह महिलांना अपुर्‍या पुरवठ्यामुळे तासन्तास उन्हातान्हात रांगेत उभे राहूनही लस मिळत नाही. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लसीकरणासाठी राहुरीत तोबा गर्दी झाल्याने हे लसीकरण केंद्र करोनाचे ‘सुपर स्प्रेडर’ झाल्याची भिती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, राहुरी तालुक्यात जवळपास 52 हजार 200 कुटुंबे ग्रामीण भागात राहत असून त्यांची एकूण लोकसंख्या साधारणपणे दोन लाख 75 हजार आहे. तर नगरपालिका क्षेत्रामध्ये राहणार्‍या कुटुंबांची संख्या 15 हजाराच्या जवळपास असून लोकसंख्या साधारणपणे 71 हजार इतकी आहे. त्यामुळे एवढ्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी मोठे आव्हान उभे राहिलेले आहे. यावर प्रशासन कसे नियोजन करणार? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

सध्या राहुरी तालुक्यात 1 हजाराहून अधिक करोनाबाधित रूग्णांवर विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. अनेक ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. मात्र, यात खासगी कोविड सेंटरची संख्या मोठ्या प्रमाणात असून अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत शासकीय कोविड सेंटर सुरू आहेत. त्याकडेही प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झालेले आहे. तर तालुक्यात अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरू आहे. मात्र, अपुरा पुरवठा आणि मागणी जास्त वाढल्याने लसीकरणाची मोहीम तालुक्यात सपशेल फसली आहे.

राहुरी व देवळाली प्रवरा शहराची लोकसंख्या 70 हजाराहून अधिक आहे. मात्र, या दोन शहरांसाठी हाताच्या बोटावर मोजता येईल, एवढ्या लसीचा पुरवठा करण्यात येतो. त्यातही आरोग्य व तालुका प्रशासनाचा लसीकरण करण्यात गोंधळ उडतो. त्यामुळे लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात आलेल्या नागरिकांचा हिरमोड होतो. पर्यायाने लसीकरण केंद्रावर गर्दी होऊन ही लसीकरण केंद्र आता लस मिळण्याऐवजी करोना संसर्गाचे ‘हॉटस्पॉट’ ठरू लागले आहेत. यावर प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. देवळाली प्रवरा शहराची लोकसंख्या 30 ते 35 हजार व राहुरी शहराची लोकसंख्या 50 हजाराच्या पुढेच असून या दोन्हीही ठिकाणी लसीकरणासाठी अवघे एक सेंटर देण्यात आले आहे. त्यातच आरोग्य कर्मचार्‍यांची कमतरता आणि आरोग्य व्यवस्थेचा गलथानपणा यामुळे नागरिकांची ‘लस नको पण करोना आवर’ अशी स्थिती झाली आहे.

सध्या तालुक्यात आरोग्य कर्मचार्‍यांना पीपीई कीट उपलब्ध नाहीत, तर तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक घरात करोनाबाधित रूग्ण महागड्या उपचारांमुळे घरीच उपचार घेत आहेत. पर्यायाने आरोग्य सेविका व आरोग्य कर्मचार्‍यांनाही धोका संभवतो आहे. मात्र, प्रशासन यावर काहीच उपाययोजना करीत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. राहुरी शहराची लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे राहुरी शहरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी राहुरी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शिवाजीराव सोनवणे यांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com