राहुरी विद्यापिठाच्या कार्यक्षेत्रात एक लाख वृक्ष लागवडीचे नियोजन - कुलगुरू डॉ. पाटील

राहुरी विद्यापिठाच्या कार्यक्षेत्रात एक लाख वृक्ष लागवडीचे नियोजन - कुलगुरू डॉ. पाटील

राहुरी विद्यापिठ |वार्ताहर| Rahuri

राहुरी कृषिविद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात 1 लाख वृक्ष लागवडीचे नियोजन असून आज रोजी मध्यवर्ती परिसरातील विविध प्रकल्पांच्या प्रक्षेत्रावर 20 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी.पाटील यांनी दिली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कृषी सप्ताहनिमित्त मध्यवर्ती परिसरातील विविध प्रकल्पांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.

डॉ. पाटील यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व सांगताना माहिती दिली, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्रात हरितक्रांतीबरोबरच अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण झाला. कै. वसंतराव नाईक यांच्या स्मृतीप्रित्यर्थ महाराष्ट्रात 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. याचबरोबर 1 ते 7 जुलै या दरम्यान कृषी सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. विद्यापीठात आजपर्यंत 3 लाख 93 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असूनत्यापैकी 80 टक्के वृक्ष आज चांगल्या अवस्थेत आहेत तसेच आंबा, जांभूळ, पेरू, बांबू आदी 20 हजार झाडांची लागवड मध्यवर्ती परिसरातील विविध प्रकल्पांच्या प्रक्षेत्रावर करण्यात येणार आहे.

यावेळी डॉ. शरद गडाख, डॉ. प्रमोद रसाळ, प्रमोद लहाळे, डॉ. बापूसाहेब भाकरे, डॉ. दिलीप पवार, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. मिलिंद अहिरे, तहसीलदार फसियोद्दिन शेख, तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, विभागीय वन अधिकारी वाय.जे. पाचारणे, डॉ. महानंद माने, डॉ. पवन कुलवाल व प्रसारण केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. पंडित खर्डे आदी उपस्थित होते.

आदर्श गाव योजनेंतर्गत पाणलोट क्षेत्र, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प-वनशेती, मध्यवर्ती रोपवाटीका/बियाणे विभागांतर्गत ड विभाग, उद्यानविद्या रोपवाटीका विभाग व अखिल भारतीय समन्वीत वनशेती प्रकल्प, डिग्रस टेकडी या प्रक्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यात आली. याठिकाणी झालेल्या वृक्षलागवडीचे नियोजन डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. आनंद सोळंके, डॉ. सचिन नांदगुडे, डॉ. भिमराज नजन व डॉ. बाबासाहेब सिनारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. वनमहोत्सव कार्यक्रमाचे नियोजन डॉ. के.डी. चव्हाण आणि डॉ. गोकुळ वामन यांनी केले. या कार्यक्रमात विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com