राहुरी विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव कासार यांचा जामीन अर्ज फेटाळला

राहुरी विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव कासार यांचा जामीन अर्ज फेटाळला

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

विनयभंग, लाचलुचपतच्या दोन ठिकाणी झालेल्या कारवाईची टांगती तलवार कायम असतानाच राहुरी येथील अनुसूचित जाती जमातीच्या दाखल गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आता महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलसचिव व येवला येथील विद्यमान प्रांताधिकारी सोपानराव कासार यांची अटक अटळ मानली जात आहे.

दरम्यान औरंगाबाद खंडपीठात बाळासाहेब जाधव यांनी दाखल केलेल्या याचिकेत जाधव यांच्या वतीने अ‍ॅड. सुनिता सोनवणे यांनी कायदेशीर लढाई सक्षमपणे लढून कासार यांचा तुरूंगवासाचा मार्ग मोकळा करून दिला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठात कुलसचिव पदासाठी सोपान कासार यांची निवड बेकायदेशीरपणे झाली असल्याचे निवेदन बाळासाहेब जाधव यांनी मुख्यमंत्री, राज्यपाल, कृषीमंत्र्यांना दिले होते. तर जाधव हे कृषीमंत्री विद्यापीठात आले असताना त्यांना समक्ष भेटून निवेदन देण्यासाठी गेले होते. त्यावेळी जाधव यांना कासार यांनी जातीवाचक शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिली होती.

त्यापूर्वी जाधव यांनी चुकीच्या निवडीविरोधात निवेदन दिल्याने त्याचा राग मनात ठेवून जाधव यांना मानसिक त्रास दिला. त्यांना विद्यापीठात प्रवेश बंदी करण्यात आली. त्यांच्या विरोधात विद्यापीठाचे कार्यक्षेत्र असलेल्या 10 जिल्ह्यातील 17 अधिकार्‍यांना जाधव यांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्याचे पत्राद्वारे आदेश दिले. संबंधितांनी पोलीस ठाणे व न्यायालयात गुन्हे दाखल करून केसेस दाखल केल्या. दरम्यान जाधव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित 17 अधिकार्‍यांनी आपआपल्या तक्रारी विनाशर्त मागे घेऊन तसे लेखी पत्र जाधव यांना दिले. 17 अधिकार्‍यांच्या विरोधात जाधव यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्या. उच्च न्यायालयाने राहुरी पोलिसांना समन्स देऊन माहिती मागविली. याप्रकरणी संबंधित 17 अधिकार्‍यांच्या विरोधात कारवाई अटळ असल्याची माहिती अ‍ॅड. सुनिता सोनवणे यांनी दिली.

दरम्यान जाधव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात कासार यांच्या विरोधात अनुसूचित जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघ यांनी जिल्हा पोलीस प्रमुख व जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन जाधव यांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप निवेदनात केला असल्याने त्यांच्याविरोधातही उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com