
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बांधकाम विभागातील विद्यमान जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक अभियंता यांचेवर दोन द्वितीय अपील प्रकरणात कारवाईचे आदेश नाशिक खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त समीर सहाय यांनी दिले आहेत.
माहिती अधिकार कार्यकर्ते सुभाष सूर्यभान गोरे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील एका प्रकरणात बांधकाम विभागात सन 2007 ते 2014 पर्यंत किती मान्यताप्राप्त ठेकेदार व त्यांचे कडील मजूर संख्या व त्यापोटी भरलेल्या भविष्य निर्वाहनिधीची वर्षा निहाय रकमेची माहिती मागितली होती. दुसर्या प्रकरणात सन 2013 ते 31 मार्च 2017 पर्यंतच्या कालावधीतील बांधकाम विभागाचे शासकीय लेखापरीक्षण अहवाला संदर्भात माहिती मागितलेली होती.
या दोन्ही प्रकरणांत सहाय्यक अभियंता तथा जन माहिती अधिकारी अंबादास जगन्नाथ भगत यांनी सुभाष गोरे यांना माहिती दिलेली नव्हती. तेव्हा त्यांनी दोन्ही प्रकरणांत विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके यांचेकडे प्रथम अपील दाखल केले होते. परंतु प्रथम अपीलावर विद्यापीठ अभियंता यांनी सुनावणी घेतली नव्हती. त्यांनी कर्तव्यात कसूर केलेला होता. नंतर सुभाष गोरे यांनी द्वितीय अपील राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नाशिक यांच्याकडे दाखल केले होते. सदर दोन्ही अपीलाची गंभीर दखल घेऊन नाशिक खंडपिठाचे राज्य माहिती आयुक्त समीर सहाय यांनी अंबादास जगन्नाथ भगत जांना केंद्रीय माहितीचा अधिकार अधिनियम 2005 चे कलम 20 अन्वये सात दिवसाच्या आत लेखी खुलासा सादर न केल्यास शास्तीचे आदेश कायम केले आहेत.
आयोगाने कुलसचिव महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांना आदेशित केले की, विद्यापीठ अभियंता तथा जन अपीलीय अधिकारी मिलिंद ढोके यांनी प्रथम अपिलावर सुनावणी न घेऊन, आदेश पारित न करून अधिनियमातील कलम 19 (6) तसेच शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक क्र. कें. मा. अर्ज 2007/1182/प्र .क्र.65/07/6 (मा.अ) दि.12/12/2007 मधील तरतुदींचे उल्लंघन केलेले असल्याने त्यांचेविरुद्ध शासन परिपत्रक सा. प्र.वि. क्र.के.मा. अर्ज 2007/74/प्र. क्र.154/07/06दि.31/03/2008 मधील तरतुदीनुसार कार्यवाही करून तीस दिवसांच्या आत अहवाल सादर करावेत.
सदर आदेशामुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली आहे. विद्यापीठातील प्रकरणे बाहेर येऊ नये म्हणून व त्यावर पांघरून टाकण्याचे काम वरिष्ठ अधिकारी सातत्याने करत आहेत. त्यात त्यांचा कोणता अर्थ दडलाय? हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.