
राहुरी विद्यापीठ |वार्ताहर| Rahuri
महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसीत केलेले कांद्याचे फुले समर्थ आणि बसवंत 780 या वाणांना शेतकर्यांची प्रथम पसंती असते. कृषी विद्यापीठाच्या बियाण्यांवर शेतकर्यांचा विश्वास आहे.शेतकर्यांना विनाकष्ट व त्यांच्या जिल्ह्यामध्ये किंवा जवळील जिल्ह्यामध्ये बियाणे उपलब्ध व्हावे म्हणून विद्यापीठ कांदा बियाणे फुले अॅग्रोमार्ट पोर्टलद्वारे ऑनलाईन विक्री करत आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या खरीप कांद्याच्या बियाण्यांची विक्रीची नोंद ऑनलाईन पोर्टलद्वारे कुलगुरू डॉ. पाटील यांच्याहस्ते सुरू करण्यात आली. याप्रसंगी डॉ. शरद गडाख, डॉ. आनंद सोळंके, डॉ. श्रीमंत रणपिसे उपस्थित होते. डॉ. शरद गडाख म्हणाले, यावर्षी कांदा पिकाचे फुले समर्थ या वाणाचे 10 हजार 533 किलो आणि बसवंत 780 या वाणाचे 226 किलो बियाणे ऑनलाईन पध्दतीने विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे बियाणे ज्या शेतकर्यांनी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करून पैसे भरलेले असतील अशा शेतकर्यांना हे बियाणे त्यांनी दिलेल्या पर्यायानुसार कृषी विज्ञान केंद्र, धुळे, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव, पिंपळगाव बसवंत संशोधन केंद्र आणि राहुरी कृषी विद्यापीठाच्या विक्री केंद्रावर उपलब्ध होईल. पुढीलवर्षी 50 टन कांदा बियाणे उत्पादनाचे नियोजन केलेले आहे. तसेच विविध फळपिकांचे 21 लाख रोपांचे पुढील वर्षासाठी नियोजन आहे.
बियाणे विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके म्हणाले, ज्या शेतकर्यांनी कांदा बियाण्यासाठी फुले अॅग्रोमार्ट पोर्टलवर नोंदणी केलेली आहे व नोंदणीवेळी जी कागदपत्रे पोर्टलवर जमा केली आहेत, त्या कागदपत्रांची झेरॉक्स आणि पैसे भरल्याची पावती बियाणे घेताना विक्री केंद्रावर जमा करणे आवश्यक आहे. प्रास्ताविक बियाणे उत्पादन अधिकारी डॉ. सी.बी साळुंखे यांनी केले. आभार डॉ. ज्ञानेश्वर क्षीरसागर यांनी मानले. कार्यक्रमाला डॉ. मधुकर भालेकर, डॉ. विजय शेलार, डॉ. सुरेश झांजरे, डॉ. बी.डी. पाटील, डॉ. कैलास गागरे, प्रा. बी.टी. शेटे, डॉ. डी.एस. ठाकरे, डॉ. एस.आर. धोंडे, डॉ. ए.व्ही. सूर्यवंशी, डॉ. आर.बी. माने, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.