राहुरीत भरपेठेत चोर्‍या, व्यापारी धास्तावले

मेडिकल दुकान, वाईन्स दुकान फोडले; पोलिसांचे दुर्लक्ष
राहुरीत भरपेठेत चोर्‍या, व्यापारी धास्तावले

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी शहरात भरपेठेत असलेले एक मेडिकल दुकान रात्री फोडून अज्ञात चोरट्यांनी हजारो रुपये चोरून नेले. तर मोटवाणी यांचे दारूच्या दुकानाचे कुलूपे तोडून चोरीचा प्रयत्न झाला. सेंटर लॉक न तुटल्याने तेथे चोरी करता आली नाही. मात्र, या घटनेने व्यापार्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

राहुरी शहरातील नवीपेठ परिसरातील ज्ञानेश्वर थिएटर जवळ मनोज पारख यांचे औषधाचे दुकान आहे. दि. 22 जून रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरला असलेली कुलूपे तोडून आत प्रवेश केला. दुकानातील सामानाची उचकापाचक करून सामान अस्ताव्यस्त केले. त्यावेळी दुकानातील चार ते पाच हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. त्याचप्रमाणे मोटवाणी यांचे दारूचे दुकान अज्ञात तीन चोरट्यांनी मध्यरात्री अडीच वाजे दरम्यान फोडण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी चोरट्यांनी शटरची कुलूपे तोडली. मात्र, त्यांना सेंटर लॉक तुटले नाही. त्यामुळे चोरीचा प्रयत्न असफल झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

सहा महिन्यांपूर्वी मोटवाणी वाईन्स हे दारूचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे सहा लाख रुपयांची रोख रक्कम चोरून नेली होती. आता पुन्हा त्यांचे दारूचे दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे मोटवाणी वाईन्स दुकानाचे चालक जसविंदरसिंग कथुरिया यांनी संताप व्यक्त केला आहे. राहुरी शहरात सुरू असलेल्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने काहीतरी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.

राहुरी तालुक्यात घरफोडी आणि दुकानफोडीच्या घटना, जुगार अड्डे, मटका, गावठी हातभट्टीची दारूविक्री आदींसह अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. तर गेल्या तीन महिन्यांत राहुरी तालुक्यातून 15 हून अधिक अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले असून त्याचा तपास शून्य आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या निष्क्रियतेविषयी नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला असून राहुरी तालुक्यात नव्याने खमक्या अधिकार्‍यांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com