राहुरी तालुक्यातील 28 पाणीवापर संस्थांचा निवडणूक बिगुल वाजला

5 ऑगस्टला मतदान || सत्तेसाठी रस्सीखेच होणार || उत्सुकता शिगेला
राहुरी तालुक्यातील 28 पाणीवापर संस्थांचा निवडणूक बिगुल वाजला

आरडगाव |वार्ताहर| Aradgav

महाराष्ट्र राज्य जलक्षेत्र सुधार प्रकल्पांतर्गत मुळा डाव्या काल्यावरील 28 पाणीवापर संस्थांच्या निवडुकीचा बिगुल वाजला आहे.

सन 2019 मध्ये मुदत संपलेल्या पाणीवापर संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. 12 जुलै रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. 14 जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करणे, 15 जुलै ते 22 जुलै सकाळी 10 ते दुपारी 3 यावेळेत नामनिर्देशन पत्र स्वीकारणे, 25 जुलै रोजी नामनिर्देशनाची छाननी आणि वैध नामनिर्देशने प्रसिद्ध करणे, 26 जुलै रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेणे, 28 जुलै रोजी निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांची चिन्हांसह यादी प्रसिद्ध करणे, 29 जुलै ते 4 ऑगस्ट रोजी निवडणूक अधिकार्‍याने निवडणुकीची तयारी करणे, निवडणूक प्रचार करणे इत्यादी तर दि.5 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. वेळ मिळाल्यास त्याचदिवशी नाहीतर दुसर्‍या दिवशी मतमोजणी आणि लगेचच निकाल देखील घोषित करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या संलग्न असणार्‍या या संस्थेच्या निवडणुकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गावागावातील सोसायटी निवडणुकीचा धुराळा शांत होत नाही, तोच या निवडणुकीत सत्तेची रस्सीखेच पहायला मिळणार आहे. त्यामुळे गावागावात पुन्हा राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. आतापर्यंत राज्यात निवडणूक आयोगाने हाती घेतलेल्या जिल्हा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत मग्न असलेले शेतकरी सभासद आता पुन्हा मुळा डाव्या काल्यावरील पाणीवापर संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. 28 पाणीवापर संस्थापैकी मागील पंचवार्षिक निवडणुकीत काही पाणीवापर संस्था बिनविरोध झाल्या. तर काही पाणीवापर संस्थेच्या निवडणुका झाल्या. पंरतु या वेळेचे चित्र वेगळे आहे. अनेकांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. एकंदरीतच या निवडणुका रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे.

रोकडेश्वर पाणीवापर संस्था बारगाव नांदूर, स्व.का.ल. पवार पाणीवापर संस्था बारागाव नांदूर, प्रसाद पाणीवापर संस्था राहुरी, बाळेश्वर पाणीवापर संस्था राहुरी, जय मल्हार पाणीवापर संस्था राहुरी, अहिल्यादेवी पाणीवापर संस्था राहुरी, जय बजरंगबली पाणीवापर संस्था राहुरी, श्री नरसोबा पाणीवापर संस्था टाकळीमिया, जगदंबा पाणीवापर संस्था तांदुळवाडी, श्री विठ्ठल पाणीवापर संस्था आरडगांव, रेणुकामाता पाणीवापर संस्था मानोरी, ब्रम्हानंद शेतकरी पाणीवापर संस्था माहेगाव, खुडसरगांव, चंद्रगिरी पाणीवापर संस्था मांजरी, संत बन्सी महाराज पाणीवापर संस्था कोपरे, हनुमान पाणीवापर संस्था वळण, संत गोविंद बाबा पाणीवापर संस्था पाथरे, संत कदम माऊली पाणीवापर संस्था पाथरे, गणेश पाणीवापर संस्था मानोरी, अमृतेश्वर पाणीवापर संस्था लाख, पांडुरंग पाणीवापर संस्था मालुंजा, त्रिंबकराज पाणीवापर संस्था देवळाली प्रवरा, आप्पासाहेब पाटील पाणीवापर संस्था देवळाली प्रवरा, चंद्रेश्वर पाणीवापर संस्था देवळाली प्रवरा, मियासाहेब पाणीवापर संस्था टाकळीमिया, छत्रपती शिवाजी महाराज पाणीवापर संस्था देवळाली प्रवरा (मोरवाडी), छत्रपती शिवाजी महाराज पाणीवापर संस्था (क्रमांक 1) त्रिंबकपूर, त्रिमूर्ती पाणीवापर संस्था मोरवाडी, मुसळवाडी अंतिम तलाव म्हसोबा पाणीवापर संस्था मुसळवाडी या 28 पाणीवापर संस्थेचा समावेश केलेला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com