राहुरी तालुक्यातील 8 गावांतील पाणीयोजनेसाठी 13 कोटी 83 लाख

ना.तनपुरे यांची माहिती
राहुरी तालुक्यातील 8 गावांतील पाणीयोजनेसाठी 13 कोटी 83 लाख

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील 8 गावांना पाणीपुरवठा योजनांसाठी 13 कोटी 83 लाख 6 हजार खर्चास जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत प्रशासकीय मान्यता मिळालेली असून लवकरच उर्वरित प्रक्रिया पूर्ण होतील, अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

या पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे 13 कोटी 83 लाख 6 हजार 383 रुपये खर्च येणार आहे. यात राहुरी मतदारसंघातील ताहाराबाद 1 कोटी 90 लाख 29 हजार 383 रुपये, जांभळी 1 कोटी 80 लाख 29 हजार 726 रुपये, म्हैसगांव 1 कोटी 94 लाख 93 हजार 252 रुपये, गुहा 1 कोटी 96 लाख 80 हजार 248 रुपये, कनगर 1 कोटी 92 लाख 90 हजार 692 रुपये, सात्रळ 1 कोटी 97 लाख 44 हजार 422 रुपये, कुरणवाडी 72 लाख 33 हजार 257 रुपये, कोळेवाडी 1 कोटी 58 लाख 4 हजार 921 रुपये अशा एकूण 8 गावांकरिता 13 कोटी 83 लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता मिळालेली असून लवकरच निविदा प्रक्रिया होऊन पुढील कामांना सुरुवात होईल.

मंत्री तनपुरे म्हणाले, आतापर्यंत राहुरी मतदारसंघातील व तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत नवीन पाणी योजनांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यापूर्वी ब्राम्हणीसह 6 सहा गावे पाणी योजनेसाठी 73 कोटी 47 लाख निधी मंजूर झाला आहे. आतापर्यंत 30 गावांना या जलजीवन मिशन पाणी योजने अंतर्गत नवीन पाणी योजनांना कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे.

मतदारसंघातील प्रत्येक गावात नवीन पाणी योजना झाली पाहिजे, या हेतूने आपण शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून मंत्रालयात प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत बैठका घेऊन या योजनांना आता अंतिम स्वरुप प्राप्त झाले आहे. या पाणी योजनांमुळे घर तेथे पाणी या योजनेमधून प्रत्येक गावात प्रत्येक घरी पाणी येणार असल्याने अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटणार आहे. उर्वरित गावांचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांनाही लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. या नवीन पाणी योजना मंजूर झाल्यामुळे संबंधित गावातील नागरिकांनी मंत्री तनपुरे यांचे अभिनंदन करून आभार व्यक्त केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com