राहुरी तालुक्यातील ऊस तोडणीत सोयरेशाहीचा हस्तक्षेप

साखर सम्राटांच्या दारात रिपाइं करणार आंदोलन- थोरात
राहुरी तालुक्यातील ऊस तोडणीत सोयरेशाहीचा हस्तक्षेप
File Photo

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

सध्या राहुरी तालुक्यात कोणी तोड देता का तोड? अशी वाईट अवस्था साखरसम्राटांनी ऊस उत्पादकांची केली आहे. राहुरी तालुक्यातील ऊस तोडीमध्ये सोयरेशाहीचा हस्तक्षेप थांबला नाही तर रिपाइंच्यावतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा रिपाइं जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिला आहे.

थोरात म्हणाले, जिल्ह्यातील सोयरेशाही राहुरी तालुक्यातील गोरगरीब शेतकर्‍यांचा गळा घोटत आहे. त्यामुळे केवळ त्यांच्याच सोयर्‍याधायर्‍यांचे ऊस गाळप केले जात आहे. त्यामुळे बिगर सोयरेधायरे बहुजन समाजातील गोरगरीब शेतकरी सुद्धा हतबल झाले आहेत. रोज सकाळी हे हताश शेतकरी एखाद्या सोयर्‍याला विनंती करून नेत्यांच्या दारात आशाळभूतपणे हेलपाटे घालत आहेत. उसाला तुरे फुटल्यामुळे तोडीवाले पैसे घेतल्याशिवाय थळात पाय ठेवायला तयार नाहीत. त्यांना पुढे करून मुजोर अधिकारी तर्रर्र होत आहेत. सर्व सत्ताधीश नेत्यांपुढे गोरगरीब हताश व लाचार झाले आहेत. गरज पडल्यास त्यांच्या घरासमोर निषेध आंदोलन करावे लागेल.

कधी नव्हे ते तालुक्यात उसाची यंदा विक्रमी लागवड झालेली आहे. यापूर्वी उसासाठी शेतकर्‍यांसमोर हात जोडणारे आज जादा ऊस झाल्याने मुजोर झाले आहेत. ऊस तोडीबाबत तालुक्यात मोठे लॉबिंग झाले असून जो-तो नेता ज्याच्या त्याच्या गटातील लोकांचे ऊस तोडत आहे. यामध्ये तोंड पाहून तोड देण्याचा कार्यक्रम सुरु आहे. वरुन संबंधित साखर कारखान्यांचे अधिकारी शेतकर्‍यांना सांगतात, तोड देतो पण तोडणीवाल्यांचे काय असेल ते बघून घ्या. म्हणजे उघडपणे पैसे मागण्याचा सपाटा सुरु झाला आहे. हा प्रकार त्वरीत बंद होऊन शेतकर्‍यांना वेळीच तोडी मिळाल्या नाही तर याविरुध्द रिपाइंच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा थोरात यांनी दिला आहे.

जादा उसाचा फायदा घेत काट्यात मारणे, दोन हजार, एकवीसशे रुपयांनी पेमेंट काढणे अशी लूट सुरु झाली आहे. ऊस तोडीबाबत कोणी जर शेतकर्‍यांना पैसे मागितले तर लगेच कळवा, असे आवाहन सुरुवातीलाच साखर संचालक शेखर गायकवाड यांनी केले होते. परंतु आता त्यांचा नियम धाब्यावर बसवून हा कार्यक्रम सुरू झाला असून याकडे शेखर गायकवाड यांनी गांभीर्याने लक्ष घालावे, अन्यथा रिपाइं रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रिपाइं जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com