राहुरी तालुक्यात परतीच्या पावसाची धुव्वाधार बॅटींग

राहुरी तालुक्यात परतीच्या पावसाची धुव्वाधार बॅटींग

शेतकर्‍यांची दाणादाण उडाली; सोयाबीन, कपाशीचे अतोनात नुकसान; ओढेनाले, बंधारे तुडूंब ; मुळा धरणातून नदीपात्रात विसर्गाने पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला; शेतकरी हतबल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात सोमवारी रात्री परतीच्या पावसाने धुव्वाधार बॅटींग केली. तालुक्यात सर्वत्र झालेल्या पावसाने शेतकर्‍यांसह नागरिकांची दाणादाण उडवून दिली. रात्रभर चाललेल्या पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी नद्यानाल्यांसह ओढ्यांनाही पूर आला आहे. अनेक ठिकाणी बंधारेच वाहून गेले आहेत. अनेक गावांचा संपर्क तुटला असून मुळा नदीपात्रातून सुमारे 8 हजार क्युसेस इतका विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वत्र पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतीपिकांसह शेतीचेही मोठे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांवर अतीव पावसामुळे धाय मोकलून रडण्याची वेळ आली आहे. रेकॉर्डब्रेक पावसामुळे मुळा धरण याचवर्षी चौथ्यांदा भरल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांची ‘कही खुशी कही गम’ अशी अवस्था झाली आहे.

सध्या तालुक्यात कपाशी आणि सोयाबीन ही पिके काढणीला आली होती. त्यातच सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेतीसह पिकेच वाहून गेली असून कपाशी व सोयाबीन पाण्यात बुडाले आहे. नदीनाले, ओढे, बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तर रस्त्यावरही पाणी साचले असून मुळा नदीवरी असलेल्या तालुक्यातील ग्रामीण भागातील पुलावरून पाणी वाहू लागल्याने केंदळ, कोंढवड, शिलेगाव, चंडकापूर, पिंपरी या गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यातील मल्हारवाडी, चिंचविहीरे, मुळा धरणाच्या पश्चिमेकडील भाग, मोमीन आखाडा, आरडगाव, कोंढवड, केंदळ, चंडकापूर, तांदुळवाडी, राहुरी शहर, राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा, टाकळीमिया, बारागाव नांदूरसह अनेक गावात मुसळधार पावसाने हजेरी लावली.

मुळा धरणक्षेत्रात सोमवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने धरणातून मुळानदीत सोडणार येणारा विसर्ग काल सकाळी वाढवून 6 हजार 150 क्युसेकने होता. तो विसर्ग नंतर 8 वाजता 8 हजार 680 क्युसेस करण्यात आला. नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा जलसंपदा विभाग व प्रशासनाने केला आहे. राहुरी शहरासह परिसरात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. मल्हारवाडी परिसरात मुसळधार पाऊस झाला. राहुरी शहरात 40 मिलिमीटर इतका पाऊस झाला. टाकळीमिया परिसरात 67 मिमी पाऊस होऊन ओढे नाले हाऊसफुल्ल होऊन शेतात पाणी शिरून पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

तालुक्यातील काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. मल्हारवाडी, बारागाव नांदूरसह अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर आला आहे. बारागाव नांदूर परिसरात ढगफुटीसदृश्य पावसाने पिकांची धूळधाण झाली. हावरीच्या ओढ्याला मोठा पूर आल्याने नांदूरचा राहुरीशी संपर्क तुटला आहे. चिंचविहीरे परिसरात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला. बंधार्‍यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. ओढेनाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. मुळा धरण परिसरात ढगफुटी झाल्याने नदीला पूर आला आहे.

मुळा धरणातून 8 हजार 670 क्युससने जायकवाडीकडे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. मात्र, धरणाची आवक मंदावल्याने धरणातून होणारा विसर्ग कमी करण्यात येऊन काल सायंकाळी तो 5 हजार 400 इतका करण्यात आला आहे. मुळानदीतील जोरदार पाण्याच्या प्रवाहाने मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली असून राहुरीला जोडणारा केंदळ व कोंढवड पूल पाण्याखाली गेला आहे. तर बारागाव नांदूरचाही सुमारे सहा तास संपर्क तुटला. नंतर पाण्याची पातळी कमी झाल्याने वाहतूक सुरळीत झाली. तालुक्यात सर्वत्र पाऊस सुरू असताना तालुक्याच्या दक्षिण भागात मात्र, तुरळक पावसाने हजेरी लावली.

तालुक्यात सर्वत्र ओला दुष्काळ सद़ृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला खरीप पावसामुळे बुडाला. या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे न करताच शेतकर्‍यांना शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.