
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी खरेदी विक्री संघात केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजने अंतर्गत हरभरा खरेदी केंद्र सुरू झाले असून शेतकर्यांनी याठिकाणी नोंदणी करावी, असे आवाहन खरेदी-विक्री संघांचे चेअरमन युवराज सुधाकर तनपुरे यांनी केले आहे.
केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजने अंतर्गत सन 2022-23 या वर्षाकरिता हरभरा खरेदी केंद्र राहुरी तालुका सह.खरेदी विक्री संघ लि. राहुरी येथे सुरू झाले आहे. ज्या शेतकर्यांना आपली नाव नोंदणी करावयाची आहे त्यांनी दिनांक 28 फेब्रुवारी 23 पासून नावे नोंदवावीत, असे खरेदी विक्री संघाचे चेअरमन युवराज तनपुरे यांनी आवाहन केले आहे.युवराज तनपुरे यांनी सांगितले, केंद्र शासनाच्या 2022-23 या वर्षाच्या आधारभूत किंमत योजनेचे पत्र जिल्हा पणन अधिकारी यांचेकडून आम्हास प्राप्त आदेशानुसार राहुरी ता.सह. खरेदी विक्री संघ येथे दि. 28 फेब्रुवारी 2023 पासून हरभरा खरेदी केंद्र सुरू केले आहे.
शासनाने धान्य खरेदीचे दर जाहीर केले आहेत. हरभरा पिकासाठी रुपये 5 हजार 335 प्रती किंटल असा भाव आहे. तरी ज्या शेतकर्यांना आपला शेतमाल द्यावयाचा असेल त्यांनी आपले नाव नोंदविताना आधारकार्ड, बँक पासबुक प्रत (राष्ट्रीयीकृत), 7/12 उतारा ऑनलाईन पीकपेरा, 8अ पत्रक, मोबाईल क्रमांक ही कागदपत्रे व शेतकर्याने स्वत: उपस्थित रहावे. नोंदणी कालावधी कमी असल्यामुळे लवकरात लवकर नोंदणी करून घ्यावी. शेतकरी नोंदणी राहुरी येथील खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात सुट्टीचे दिवस सोडून व कार्यालयीन वेळेत केली जाणार आहे.