राहुरी तालुक्यातील प्रवरानदी पात्रातून परमीटच्या नावाखाली बेसुमार वाळूउपसा

File Photo
File Photo

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील महालगाव, मालुंजे शिवारातून प्रवरानदी पात्रातून परमीटच्या नावाखाली जेसीबीच्या साह्याने सर्व नियम धाब्यावर बसवून अहोरात्र बेसुमार वाळू उपसा सुरू असुन या भागातील रस्त्याची पुर्ण वाट लागली आहे. तसेच भुगर्भातील पाणी पातळीवर याचा गंभीर परिणाम होणार असल्याची भिती परिसरातील शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे. महसूल प्रशासन याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.

राहुरी तालुक्यातील महालगाव, मालुंजे येथील प्रवरानदी पात्रातून 20 दिवसात 3 हजार 500 ब्रास वाळूउपसा करण्याचा परवाना आहे. मात्र, गेल्या 5 दिवसात 5 ते 6 ब्रास वाहतूक क्षमतेचे जवळपास 100 ते 125 वाहनांनी दररोज जेसीबीच्या साह्याने बेसुमार वाळूउपसा सुरू आहे.वाळूउपसा हा तीन फुटांपर्यत असताना नदीपात्रात मात्र 15 ते 20 फुटांपर्यत खड्डे पडले आहे. तसेच वाळू उपशासाठी फक्त दिवसाच परवानगी असताना रात्रंदिवस वाळूउपसा सुरू आहे.

चार वर्षापुर्वी अशाच बेसुमार वाळू उपशामुळे भुगर्भातील पाण्याची पातळी कमी झाल्याने या परिसरातील शेतीच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. तीच परिस्थीती परत निर्माण होती की काय? अशी भिती व्यक्त करत पर्यावरणावर याचा गंभीर परिणाम होणार आहे. तर वाळू वाहतूक करणारे साधनांची वाहतूक क्षमता जास्त असल्याने या भागातील रस्त्यांची 5 दिवसांत बिकट अवस्था झाली आहे.

महसूल प्रशासनाने संबधितांना 3 हजार 500 ब्रास वाळूचा परवाना दिला आहे. त्यापेक्षाही जास्त प्रमाणात वाळू 5 दिवसातच उपसली असून नदीपात्रातील खड्ड्यांचे इनकॅमेरा मोजमाप करून या परवानाधारकावर कारवाई करून सदरील वाळूउपसा त्वरीत बंद करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com