राहुरी तालुक्यात गुन्हेगारीचा आलेख वाढला; नागरिकांचा संताप

राहुरी तालुक्यात गुन्हेगारीचा आलेख वाढला; नागरिकांचा संताप

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे चोरीच्या आणि अपहरणाच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नव्यानेच पद्भार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुन्हेगारीचा वाढता आलेख रोखण्यास अपयश आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तालुक्यात गेल्या तीन महिन्यात सुमारे 14 हून अधिक अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले असून त्याचा तपास लावण्यात पोलीस निरीक्षक दराडे अपयशी ठरले आहेत. वाढती गुन्हेगारी आणि वाढते अवैध धंद्याकडे दुर्लक्ष करून पोलीस निरीक्षक अनेकविध सोहळ्याला हजेरी लावून आपलीच पाठ थोपटून घेत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तालुक्यात दराडे यांनी पद्भार स्वीकारल्यापासून कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे. त्यातच चोरीच्या घटना वाढल्या असून अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा तपास रखडला आहे. धूमस्टाईलने गंठण पळविणे, मोबाईल चोरी, दुचाकी चोरी, सर्रास गुटखा विक्री, मटका, जुगाराचे अड्डेही वाढले आहेत.

तालुक्याच्या ग्रामीण भागात गावठी देशीदारूच्या हातभटट्यांना उधाण आले आहे. तर अनेक ठिकाणी मटका अड्डे राजरोसपणे सुरू झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षितता रामभरोसे बनली आहे. मात्र, त्याकडे पोलीस निरीक्षक दराडे यांचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. तालुक्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी खमक्या अधिकार्‍याची नियुक्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Stories

No stories found.