राहुरी तालुक्यातील कुंटुंब कोविड सर्व्हे करणार्‍या योध्दांचा जीव धोक्यात

राहुरी तालुक्यातील कुंटुंब कोविड सर्व्हे करणार्‍या योध्दांचा जीव धोक्यात

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील कोविड सर्व्हेचा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे उडालेल्या गोंधळाचे प्रकरण ताजे असतानाच कोविड योद्ध्यांना प्रशासनाने वार्‍यावर सोडले आहे. सर्व्हे करणार्‍यांना करोना संसर्गापासून बचाव व्हावा, म्हणून 5 दिवसांसाठी किमान दिवसाला दोन याप्रमाणे 10 मास्क, फेसशिल्ड, हॅन्डग्लोज, सॅनिटायझर व सुरक्षेसाठी इतर साहित्य देणे मानवीय दृष्टिकोनातून आवश्यक होते. काही ग्रामपंचायतींनी हे साहित्य दिलेले नाही. पर्यायाने त्यांना संसर्ग होण्याचा धोका वाढलेला आहे. राहुरी तालुका प्रशासनाच्या आडमुठेपणाच्या भुमिकेमुळे अनेक सर्व्हे करणार्‍या कर्मचार्‍यांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान, कुटुंब कोविड सर्व्हेक्षणासाठी पाठविण्यात आलेल्या कर्मचार्‍यांची कोणतीही आरोग्य चाचणी घेण्यात आली नाही. त्यामुळे त्यांची सुरक्षा रामभरोसे बनली आहे.

उन्हामध्ये फिरत असताना त्यांना पाणी पिणेही अडचणीचे ठरत आहे. त्यातच त्यांच्याकडे देण्यात आलेल्या सर्व्हेवेळेच्या साहित्याचीही वानवाच आहे. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या लेखी आदेश पत्रानुसार सर्व कर्मचार्‍यांना योग्य प्रशिक्षण देऊन कामावर पाठविणे गरजेचे होते. परंतु असा कोणताही ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग त्यांचा झालेला नाही. अथवा सर्व्हेचे कर्तव्य बजावत असताना घ्यावयाची काळजी, येणार्‍या अडचणींना कसे सामोरे जावे? या संदर्भातील मार्गदर्शन याची लिखीत स्वरूपातील कोणत्याही प्रकारची ऑनलाइन पीडीएफ अथवा माहिती पुस्तिका कर्मचार्‍यांना देण्यात आली नाही.

दहा ग्रामपंचायतीमागे त्यांच्यावर नेमलेला सुपरवायझर त्यांना काय कमी आहे किंवा जास्त आहे? याकामी त्यांना साधा संपर्कही झाला नाही. किंवा त्यांचे फोननंबरही उपलब्ध नसल्यामुळे सुपरवायझर नेमले नसावेत, यावर शिक्कामोर्तब होते. पथकातील सहाय्यक कर्मचार्‍यांची नेमणूक करताना मर्जीतील काही खास कर्मचार्‍यांना ते शंभर टक्के कोणताही आजार नसताना किंवा हायरिस्कमध्ये नसतानाही अर्थपूर्ण संबंधांमुळे ड्युटी दिली नाही. याउलट आजारी असणारे हायरिस्कमधील कर्मचार्‍यांची बेपर्वाईने बेजबाबदारपणे प्रथम नियुक्ती केलेली आहे. हायरिस्कमध्ये असताना त्यांच्या जीविताला जर काही झाले तर त्याला जबाबदार कोण? काहीजणांना तर लस न देताच कामावर पाठविले आहे.

कर्मचार्‍यांची वैद्यकीय तपासणी न करताच त्यांच्या कोणत्याही आजाराबाबत ऐकून घेतले जात नाही. काही जणांना तर आदल्या दिवशी लसीचा पहिला डोस लगेच देऊन दुसर्‍या दिवशी कामावर पाठविले असल्यामुळे त्यांना बराच त्रास झाल्याचे समजते. कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह आहेत किंवा नाही? याची खातरजमा न करताच आदेश देण्यात आलेले आहेत. शिवाय प्रशासनाने कोविड योद्ध्यांचा विमा काढण्याचे जाहीर केले होते. या संदर्भातील कोणतीही कल्पना अथवा आश्वासन हे कर्मचार्‍यांना दिलेले नाही. उलट कोणी काही म्हणायला गेल्यास त्यांना शासकीय खाक्या दाखवून दमबाजी करण्यात येते.

त्यांच्या अडचणी समजून घेतल्या जात नाहीत. उलट शासकीय नियमांचा पाढा त्यांच्यासमोर वाचला जातो. कर्मचार्‍यांची अवस्था ही ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ अशी झालेली आहे. तरीही ते जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. परंतु त्यांच्या व्यथा समजून घेण्यास प्रशासन तयार नाही. शेवटी कर्मचार्‍यांनाही कुटुंब आहे, त्यांच्या जीविताची योग्य ती काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे, अशी मागणी जनतेतून होत आहे. आडमुठेपणाने वागणार्‍या व कर्मचार्‍यांच्या जिविताशी खेळणार्‍या प्रशासनाच्या दबंगगिरीचा निषेध व्यक्त होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com