राहुरी तालुक्यात करोनाचे ‘रेकॉर्डब्रेक’

72 तासात 715 नागरिकांना बाधा; एकाच आठवड्यात 16 जणांचा बळी
राहुरी तालुक्यात करोनाचे ‘रेकॉर्डब्रेक’
File Photo

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात गेल्या 72 तासात करोनाबाधितांच्या संख्येने रेकॉर्डब्रेक केले. तीन दिवसात 715 नागरिकांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान, मागील आठवड्यात 16 जणांचा राहुरी तालुक्यात करोना महामारीमुळे बळी गेला आहे.

दरम्यान, एकीकडे रूग्णांची संख्या वाढत असताना खासगी कोविड सेंटरचीही संख्या वाढली असली तरीही अपुर्‍या आरोग्य सुविधांमुळे हे कोविड सेंटर कुचकामी ठरत आहेत. काही खासगी कोविड सेंटरमधून रूग्णांच्या नातेवाईकांची मोठी आर्थिक लूट होत असूनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

गेल्या महिन्यापासून तालुक्यात करोनाबाधितांच्या संख्येने शतक ओलांडले होते. नंतर मागील आठवड्यात ही संख्या द्विशतकावर जाऊन पोहोचली. तर गेल्या तीन दिवसात रेकॉर्डब्रेक होऊन सातशेच्या पार गेली आहे. त्यामुळे नागरिक दहशतीखाली वावरत आहेत. सध्या तालुक्यात अनेक ठिकाणी लसीकरण ठप्प असून लॉकडाऊनचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. तर कुटुंब कोविड सर्वेक्षणामुळे संसर्गाचा धोका आणखी वाढला आहे. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तालुक्याच्या ग्रामीण भागातही करोना महामारीचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. देवळाली प्रवरात करोनाबाधितांची संख्या वाढत असून शनिवार देवळालीकरांसाठी घातवार ठरला आहे. एकाच दिवशी चार करोनाबाधितांचा मृत्यू झाला. शुक्रवार व शनिवार देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरीत एकूण 50 करोना रूग्ण आढळून आले आहेत. यातील तीन करोना बाधित उपचार घेत असताना मृत पावले. तर एका कामगाराचा कामगार दिनी घरातच मृत्यू झाला. तालुक्यात करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे राहुरी विद्यापीठातील कोविड सेंटर परिसरात चक्क वापरलेल्या पीपीई कीट निष्काळजीपणे भररस्त्यावर फेकून दिलेल्या आढळल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

अशाप्रकारे पीपीई कीट रस्त्यावर टाकून करोना फैलावण्यास एक प्रकारे निमंत्रण दिले जात आहे, यातून परिसरातील लोकांना बाधा झाली तर जबाबदार कोण? असा सवाल नागरिकांनी प्रशासनाला विचारला आहे. विद्यापीठात अनेक गावातून शेकडो कर्मचारी येतात, त्यांना बाधा झाल्यास तालुक्यातील अनेक गावांमध्ये संसर्गाचा धोका वाढू शकतो. अधिकार्‍याच्या बेपफिकीरीमुळे विद्यापीठातील कोविड सेंटर परिसरात साचलेल्या पीपीइ कीट व इतर बायोमेडिकल कचर्‍यामुळे कोविड सेंटरमध्ये येणारे रुग्णाचे नातेवाईक व काम करणारे कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com