राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यात मागील एक महिन्यापासून दडी मारून बसलेल्या करोना महामारीने पुन्हा दमदार एण्ट्री केली आहे.

काल दिवसभरात सहा तर गेल्या आठवड्याभरात एकूण 19 जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नागरिक पुन्हा भयभीत झाले आहेत. सहा बाधित रूग्णांना राहुरी कृषी विद्यापीठात क्वारंटाईन करण्यात आले आहे. काल बाधा झालेल्या रुग्णांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. मागील महिन्यात राहुरी तालुक्यात करोनाची सरासरी आकडेवारी शुन्यावरच स्थिरावली होती.

मात्र, गेल्या आठवड्याभरात 19 जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. तर काल दिवसभरात सहाजणांना करोनाची बाधा झाल्याने नागरिकांमध्ये पुन्हा दहशत पसरली आहे. तालुका प्रशासन व आरोग्य प्रशासनाचे लॉकडाऊनच्या नियमावलीकडे दुर्लक्ष झाल्याने तालुक्यात पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाची पायमल्ली करून राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे. तर जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला तालुका महसूल प्रशासन व आरोग्य प्रशासनाने केराची टोपली दाखविल्याने करोनाची बाधा वाढू लागली आहे.

सध्या तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली असून कोणत्याही विद्यालयात सोशल डिस्टन्सचे पालन केले जात नाही. शिक्षकच विनामास्क शाळेत येत असून अद्याप बहुतांशी विद्यालयात शिक्षकांची करोना चाचणी झाली नसल्याने विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षा धोक्यात आल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. कोणत्याच विद्यालयात सॅनिटायझरचा वापर केला जात नसल्याने विद्यार्थ्यांना बाधा होण्याची भिती पालकांनी व्यक्त केली आहे.

याबाबत जिल्हाधिकार्यांनी तालुका प्रशासनाला जाब विचारण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. बाधित रूग्णांची संख्या व गाव पुढीलप्रमाणेः राहुरी शहर 3 (2 पुरुष, 58, 31 वर्ष व 1 महिला 55 वर्ष), केसापूर 2 ( 62 वर्ष पुरुष, 56 वर्ष महिला), राहुरी कृषी विद्यापीठात 1( 32 वर्ष महिला) अशा सहाजणांना करोनाची बाधा झाली आहे.