
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचे प्रमाण वाढत असलून दोन दिवसांपूर्वी पुन्हा एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले आहे. गेल्या महिनाभरातील ही पाचवी अपहरणाची घटना असून यापूर्वीच्या अपहरणाच्या घटनेचा तपास लावण्यात राहुरी पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे राहुरी तालुक्यातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, राहुरी तालुक्यात अपहरण, दरोडा, घरफोडी, दुचाकी चोरी, मोबाईल चोरीच्या घटना वाढल्याने संतप्त नागरिकांनी राहुरी पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केली असून तालुक्याला एखाद्या खमक्या पोलीस अधिकार्याची नेमणूक करण्याची मागणी होत आहे.
राहुरी तालुक्यातील एका गावातून दि. 1 डिसेंबर रोजी आई-वडिलांच्या कायदेशीर रखवालीतून त्यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या अल्पवयीन मुलीला अक्षय पवार नामक तरूणाने पळवून नेल्याचा संशय तिच्या आई-वडिलांनी व्यक्त केला आहे.
तालुक्यातील एका गावात मुलीचे वडील आपल्या कुटुंबासह राहतात. ते मोल मजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दि. 1 डिसेंबर रोजी रात्री नेहमी प्रमाणेच कुटुंबातील लोकं जेवण करुन झोपी गेले. 2 डिसेंबर रोजी पहाटे पाच वाजे दरम्यान त्या मुलीचे वडील झोपेतून उठले. त्यावेळी त्यांची 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात दिसली नाही. तेव्हा घरातील लोकांनी आजूबाजूला व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. याप्रकरणी त्या मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अक्षय पवार याच्या विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.