राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

केंद्र सरकारने शेतकर्यांना अधोगतीस घालणारे जुलमी कृषी कायदे त्वरित रद्द करावेत, या मागणीसाठी राहुरी तहसील कार्यालयासमोर

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार तालुकाध्यक्ष बाळासाहेब आढाव यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.

तालुकाध्यक्ष आढाव म्हणाले, काँग्रेस पक्षाने या भाजपा सरकारच्या कृषी कायद्यांचा पहिल्यापासून विरोध केला असून शेतकर्यांचे जीवनमान उद्ध्वस्त करणारे हे कायदे त्वरित रद्द करावेत. यासाठी दिल्लीत शेतकर्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा व्यक्त केला. शासनाने जुलमी कृषी कायदे शेतकर्यांच्या हिताचे नसताना लादण्याचे काम करू नये, अन्यथा या आंदोलनाचा हा वणवा देशभर सुरू होईल, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अॅड. पंढरीनाथ पवार, डॉ. जयंत कुलकर्णी, संजय पोटे, बबन ढोकणे, कैलास पठारे आदींनी संतप्त भावना व्यक्त केल्या व हे कायदे रद्द करण्याची जोरदार मागणी केली. तहसीलदार फसियोद्दीन शेख यांना आंदोलकांच्यावतीने निवेदन देण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे दादापाटील आढाव, अजित तारडे, शेख, शशिकांत गाडे, बाबा आढाव, अशोक कोकणे, एकनाथ दुशिंग, रावसाहेब गडाख, संजय विधाटे, विकास तरवडे, गणेश गुंजाळ, बापू करपे, संजय तनपुरे, श्रीकांत गुंडे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.