
राहुरी (तालुका प्रतिनिधी)
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून दोन महिने झाले तरी अद्याप कोणतीही मदत शासनाकडून शेतकर्यांना मिळाली नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसेनेने (ठाकरे गट) शेतकर्यांना शासकिय मदत मिळावी म्हणून राहुरी तालुक्यातील मुळाधरणात जलसमाधी घेण्याचे आंदोलन सुरू केले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच 13 आंदोलकांना ताब्यात घेतले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे व शिवसेनेचे(ठाकरे गट) उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली हे जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी राहुरी पोलीसांनी आंदोलकांना मुळाधरणाकडे जाण्यास रोखण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात ठेवला होता. आंदोलक मुळाधरणावर आले असता त्यांना पोलीसांनी शांततेत आंदोलन करून मागे फिरण्याची विनंती केली.
मात्र, आंदोलक आक्रमक झाल्याने काही आंदोलकांनी पोलीसांची नजर चुकवून धरणात उड्या घेऊन आंदोलन करू लागले. पोलीसांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखून बोटीने खलाशांच्या सहाय्याने धरणात उड्या घेतलेल्या आंदोलकांना बाहेर काढले. यावेळी पोलीस व आंदोलक यांच्या झटापट झाल्याने पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. मोरे व खेवरे यांना पोलीसांनी उचलून गाडीत घातले.
यावेळी जोपर्यंत शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळत नाही व याबाबतचे लेखी आश्वासन मिळत नाही, तो पर्यंत आम्ही दररोज मुळाधरणावर येऊन आंदोलन करणार असल्याचा पावित्रा आंदोलकांनी घेतला होता. यावेळी राहुरीचे तहसिलदार फसियोद्दीन शेख, पो.नि. प्रताप दराडे, पो.उप.नि. सज्जनकुमार नार्हेडा, पो.उप.नि. निरज बोकील आदी उपस्थित होते.