राहुरी तालुक्यातील साखर पट्ट्यात ऊसशेतीचा पारंपरिक पॅटर्न बदलला

राहुरी तालुक्यातील साखर पट्ट्यात ऊसशेतीचा पारंपरिक पॅटर्न बदलला

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Devlali Pravara

मुळा आणि भंडारदरा या दोन्ही धरणाचे पाणी असलेला सुजलाम सुफलाम असलेल्या राहुरी तालुक्याची साखरपट्टा म्हणून ओळख आहे. बागायती शेती असल्याने या ठिकाणी उसाचे पीक मुबलक म्हणूनच तालुक्यात दोन साखर कारखाने आहेत. परंतु त्यांना देखील पुरून उरतो, इतका ऊस या तालुक्यात पिकतो. परंतु गेल्या काही वर्षापासून उत्पादन खर्चाप्रमाणे या पिकाला भाव मिळत नसल्याने शेतीची पडतळ बसत नाही. म्हणून तालुक्यातील शेतकरी ऊस सोडून कांदा व कपाशी या नगदी पिकाकडे वळल्याने उसाच्या पट्टयातील शेतीचा पॅटर्न बदलला आहे.

पूर्वी उसाला गळिताला जाण्यास 18 ते 20 महिने लागत. या पिकाला अडसाली पीक म्हणत असत. अडसाली असल्याने या पिकाचे एकरी 90 ते 100 टन वजन बसत असे. त्यातून शेतकर्‍यांना चांगले पैसे भेटत. त्यावेळी उसाचा खरेदीदर जरी कमी असला तरी रासायनिक खते, मजुरीचे दर, किटकनाशकाचे दर हे सर्व कमी होते. साखर कारखानदारीत भ्रष्टाचार आताच्यासारखा नव्हता. त्यामुळे शेतकरी नगदी पीक म्हणून ऊस पिकाकडे वळला होता. आता अडसाली पिकावर सुरु पिकावर शेतकरी आले आहेत. उसाचे नवीन वाण 12 महिन्यात गळितास येत आहे. परंतु टनेजमध्ये मात्र मोठी घट झाल्याने व मधली खाबूगिरी वाढल्याने हे पीक शेतकर्‍यांना परवडेनासे झाले. बारा महिने पाणी घालून हातात काहीच शिल्लक राहत नसल्याने उसाचा पारंपरिक पॅटर्न बदलून शेतकरी आता कांदा, कपाशी व सोयाबीन या पिकाकडे वळला आहे.

उसाचे 12 महिन्यात सरसरी 45 ते 50 टन उत्पन्न निघते. त्या तुलनेत कपाशी व कांदा किंवा सोयाबीन व कांदा अशी दोन पिके वर्षाला निघतात. आणि दोन्ही पिकांची बेरीज केली तर उसापेक्षा जास्त पैसे शिल्लक राहतात. शिवाय जमिनीचा पोत देखील टिकून राहतो.

कांदा पिकाचे एकरी सरासरी 10 टन उत्पन्न निघते. आजच्या सोळाशे रुपये बाजारभावा प्रमाणे जरी म्हटले तरी एकरी 1 लाख 60 हजार रुपये होतात. 50 हजार रुपये खर्च गेला तरी 1 लाख 10 हजाराचे चार महिन्यात उत्पन्न मिळते. या नंतर कपाशी पीक केल्यानंतर साधारणपणे एकरी 10 ते 15 क्विंटल कापूस बागायत भागात निघतो. 5 हजाराचा भाव मिळाला तरी 50 ते 75 हजार रुपये मिळतात. यातून 25 हजार खर्च गेला तरी 40 ते 50 हजाराचे उत्पन्न मिळते. किंवा सोयाबीन पीक केले तरी एकरी खर्च वजा जाता 30 ते 40 हजाराचे उत्पन्न मिळते. वरील दोन्ही पिकांचा कालावधी सारखाच आहे. आजच्या सारखा साडेसात हजार रुपये भाव सोयाबीनला भेटला तर यापेक्षा जास्त उत्पन्न मिळते. सोयाबीन किंवा कपाशी ही पिके काढून पुन्हा कांदा पिकासाठी रानं तयार होतय. वर्षात दोन पिके निघत असल्याने व दोन्हीची बेरीज केली तर उसापेक्षा जास्त उत्पन्न मिळत असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी याकडे वळला आहे.

ऊस जरी शेतकर्‍यांचे पारंपरिक पीक असले तरी साखर कारखानदार शेतकर्‍यांना भावात पिळून मारतात. उसाची चुट्टी देखील वायाला जात नाही. त्यापासून देखील भुसा होतो. मळीपासून देशीदारु व अल्कोहोल तयार होते. परंतु साखर कारखानदार याचा छदामही शेतकर्‍यांना देत नाहीत. कधी हिशोबही देत नाहीत. यांच्याशी संघर्ष करण्यापेक्षा स्वतःच्या पाया वर उभे राहण्याचा निर्णय घेऊन शेतकर्‍यांनी ऊस शेतीचा पॅटर्न बदलवला असून त्यातून उसापेक्षा जास्त उत्पन्न मिळत असल्याने उर्वरित शेतकरी जर या पॅटर्नकडे वळला तर कोणी ऊस देता का ऊस? अशी म्हणण्याची वेळ साखर कारखानदारांवर येऊ शकते. यासाठी साखर कारखानदारांनी आता तरी उसाला चांगला भाव देण्याचे नियोजन करावे, अन्यथा कोणी ऊस देता का ऊस? अशी याचना करावी लागणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com